अंदरसूलची गुणवंत भाग्यश्री होणार ‘सीए’; दानशूरांकडून तिच्या पंखांना बळ

संतोष घोडेराव
Wednesday, 23 September 2020

शेतमजूर कुटुंबातील भाग्यश्रीच्या या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले अन् गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून भाग्यश्रीवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. पस्तीस दिवसांत व्हॉट्सअॅप ग्रुप व सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध स्तरांतील दानशूर व्यक्तींनी आर्थिक स्वरूपाची तब्बल ९० हजार रुपयांची मदत जमा केली.

नाशिक : (अंदरसूल) अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून बारावी वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने आलेल्या अंदरसूलच्या भाग्यश्री देशमुखला दानशूर व्यक्तींनी एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत करून गुणवंत भाग्यश्रीचे सीए होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनोखी भेट दिली. 

दानशूरांकडून एक लाख रुपयांची मदत 

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री देशमुखचे पितृछत्र हरपल्यानंतर खंबीरपणे आपल्या आईला घर व शेती कामात मदत करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भाग्यश्रीने वाणिज्य विभागातून बारावीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून आईचे स्वप्न साकार केले. शेतमजूर कुटुंबातील भाग्यश्रीच्या या नेत्रदीपक कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले अन् गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून भाग्यश्रीवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. पस्तीस दिवसांत व्हॉट्सअॅप ग्रुप व सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध स्तरांतील दानशूर व्यक्तींनी आर्थिक स्वरूपाची तब्बल ९० हजार रुपयांची मदत जमा केली. यामध्ये महात्मा फुले शिक्षण संस्था नाशिकचे अध्यक्ष व अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड. सुभाष सोनवणे यांनीही ११ हजार रुपयांची मदत देऊन एकूण एक लाख एक हजार रुपयांची रक्कम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, संचालक मकरंद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, अमोल सोनवणे आदींच्या हस्ते भाग्यश्रीच्या घरी जाऊन दिली. या वेळी तिच्या आईने सर्वांचे आभार मानत सर्वांचेच ऋणी असल्याचे सांगितले. 

भाग्यश्रीला केली मदत सुपूर्द 

तालुक्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप व सोशल मीडियावर बारावीचा निकाल लागल्यानंतर भाग्यश्रीच्या कौतुकाची व परिस्थितीची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्याने ग्रुप सदस्य प्रा. मच्छिंद्र सोळसे यांनी सर्वप्रथम पाचशे एक रुपये बक्षीस जाहीर केले अन् बघता बघता ३५ दिवसांत जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व परदेशातून भाग्यश्रीला तब्बल एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. विविध ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेली ही लाखाची रक्कम थेट भाग्यश्रीच्या घरी जाऊन दिली. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

माझे सीए होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला सर्व स्तरांतून आर्थिक स्वरूपाची खूप मोठी अशी मदत मिळाली. यातून मला प्रेरणा मिळाल्याने नक्कीच स्वप्नपूर्तीसाठी चांगले प्रयत्न करणार आहे. - भाग्यश्री देशमुख, विद्यार्थिनी  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: philanthropists donated one lakh rupees for the student's education nashik marathi news