"अबोलातूनही बहरला प्रेमाचा मळा...दिव्यांगत्वामुळे आलेल्या दुःखाचे आपण समान भागीदार"

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

लहानपणापासून मूकबधिर असल्याने जगाचा कुठलाही मागमूस नाही. त्यामुळे व्यक्‍त होणार तरी कसे... तरीसुद्धा लहानपणापासून एकमेकांचा मिळालेला सहवास... दिव्यांगत्वामुळे आलेल्या दुःखाचे आपण समान भागीदार असल्याच्या भावनेतून निर्माण झालेली जवळीक... त्यानंतर त्याचे प्रेमात रूपांतर होऊन विवाहबंधनात अडकलेले अर्चना व पंकज यांच्या प्रेमाची ही गोष्ट...

नाशिक / इंदिरानगर : लहानपणापासून मूकबधिर असल्याने जगाचा कुठलाही मागमूस नाही. त्यामुळे व्यक्‍त होणार तरी कसे... तरीसुद्धा लहानपणापासून एकमेकांचा मिळालेला सहवास... दिव्यांगत्वामुळे आलेल्या दुःखाचे आपण समान भागीदार असल्याच्या भावनेतून निर्माण झालेली जवळीक... त्यानंतर त्याचे प्रेमात रूपांतर होऊन विवाहबंधनात अडकलेले अर्चना व पंकज यांच्या प्रेमाची ही गोष्ट...

अन् ते झाले एकमेकांचे...

बालपणापासून एकाच शाळेत सोबत असल्याने पाथर्डी येथील अर्चना आणि सातपूर येथील पंकज शुक्रवारी (ता. 8) पाथर्डी येथील दोंदे मळा येथे अवघ्या 17 जणांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले. या दोघांसह अर्चनाचे शेतकरी वडील संजय दोंदे, आई चित्रा व भाऊ रणधीर उपस्थित होते. तर वरपक्षाकडून पंकजचे कंपनीत कामाला असणारे वडील शिवमुरत यादव आणि आई कमला यांनीही या आदर्श विवाहात उपस्थित असलेल्यांचे स्वागत केले. लहानपणापासून दिव्यांग असलेल्या दोघांच्या नशिबी अशी स्थिती आल्याने कुटुंबीय काहीसे व्यथीत होते. पहिलीपासून ते पडसाद कर्णबधिर विद्यालयात शिकत होते. तेथूनच त्यांची ही अनोखी अबोल मैत्री सुरू झाली. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांचा संपर्क कायम होता. त्यांच्यात निर्माण झालेले ऋणानुबंध दोघांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचले. सर्वांनी आनंदाने निर्णय घेत त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरविले.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

सॅनिटायझरचा वापर
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेत प्रत्येकाला सॅनिटायझरचा वापर करूनच मंडपात प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. प्रत्येकाने मास्क परिधान केले होते. स्थानिक नगरसेवक भगवान दोंदे यांच्या भावकीमधीलच वधू असल्याने त्यांनीदेखील तिला संसारोपयोगी साहित्य भेट दिले. बौद्धचार्य सुधीर दोंदे यांनी मंगल परिणय करून दिला. गौतम दोंदे, उत्तम दोंदे, शरद दोंदे आदींसह कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physically handicapped Archana and Pankaj tie a knot marriage bond nashik marathi news