पिंपळगाव बसवंतच्या टोमॅटोचा आखाती देशांत डंका! दराची जोरदार उसळी

dubai tomato.jpg
dubai tomato.jpg

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : यंदाचे वर्ष टोमॅटो दरासाठी ऐतिहासिक ठरले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एकदाही टोमॅटोचे दर प्रतिक्रेट चारशे रुपयांपेक्षा खाली आले नाही. आता तर दीड महिन्यापासून दुबई, ओमान, कतार या आखाती देशांतही पिंपळगावचा टोमॅटो भाव खातोय. तेथे टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी घेतली असून, पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोला प्रतिक्रेट ७५० रुपये असा आकर्षक दर मिळाला. गेल्या २० वर्षांत प्रथमच टोमॅटोच्या भावाची लाली टिकून राहिली असून, मागणी वाढल्यास हे दर हजार रुपयांपर्यंत झेप घेऊ शकतात. 

पिंपळगाव बसवंतचा टोमॅटो आखाती देशांत खातोय भाव
यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच किरकोळ पडझड वगळता टोमॅटोच्या दराचा आलेख उंचावत राहिला आहे. हंगाम मध्याच्या पुढे सरकला असून, पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी (ता. १२) एक लाख क्रेट टोमॅटोची आवक झाली. देशभरासह परदेशातूनही मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये टोमॅटो खरेदीसाठी चढाओढ झाली. जोरदार चढउतार असणारे टोमॅटोचे दर दीड महिन्यापासून उच्चांकी असून, कमालीचे स्थिर आहेत. वीस किलोच्या क्रेटला सरासरी ५२१ रुपये, तर प्रतिकिलो ४५ रुपये असा दर मिळाला. 

आखाती देशात डंका 
ऑगस्टमध्ये टोमॅटोचा हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिने निर्यात होऊ शकली नाही. या काळात आखाती देशांमध्ये इराणचा टोमॅटो पोचत होता. त्यामुळे पिंपळगावच्या टोमॅटोला दारे बंद होती. मात्र, इराणमध्ये दीड महिन्यापासून मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी झाल्याने तेथील टोमॅटोचे पीक भुईसपाट झाले. दुबई, ओमान, कतारसह बांग्लादेशातही सध्या पिंपळगावच्या टोमॅटोचा डंका आहे. रोज सातशे टन टोमॅटो आखाती देशांत पोचत आहे. निर्यात सुरू झाल्याने स्थानिक बाजारपेठेतील टोमॅटोचे दरही वधारले आहेत. बेंगळुरू, रतलाम येथेही टोमॅटोचा हंगाम सुरू झाला आहे. पण, निर्यातीचे दारे खुली झाल्याने दर कडाडले असून, शेतकऱ्यांसाठी जणू ‘लालक्रांती’च झाली आहे. 
अतिवृष्टीने भारतातील टोमॅटोचा हंगाम लवकर संपला आहे. देशभराच्या टोमॅटो मागणीची भिस्त नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगावच्या बाजारपेठेवर आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांमधून मागणी वाढल्याने टोमॅटोच्या दरात जोरदार तेजी आली आहे. मुसळधारेच्या संकटात नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, दिंडोरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यांच्या कष्टाला फळ मिळू लागले असून, कोरोनाच्या सावटातही टोमॅटोचे उत्पादन घेण्याचे धाडस करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. 

रोज सहा कोटींची उलाढाल 
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्टमध्ये श्रीगणेशा झालेला टोमॅटोचा हंगाम आता उत्तरार्धाकडे झुकला आहे. उन्हाळी व पावसाळ्यात लागवड झालेला टोमॅटो टप्प्याटप्पयाने बाजारपेठेत येतो. दीड महिन्यापूर्वी रोज टोमॅटोचे २० किलो पॅकिंग असलेल्या दोन लाख क्रेटची आवक होत होती. आता ती एक लाखावर आली आहे. निर्यातीमुळे दराला झळाळी कायम असल्याने पिंपळगाव बाजार समितीत एकट्या टोमॅटोमधून रोज सहा कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. अजून महिनाभर हंगाम सुरू राहील, अशी स्थिती आहे. 
हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

हंगामाच्या सुरवातीला आखाती देशांत इराणचा टोमॅटो स्वस्त व कमी वेळेत उपलब्ध होत असल्याने पिंपळगांवच्या टोमॅटोला मागणी नव्हती. पण, इराणमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्याने पिंपळगावचा टोमॅटो दीड महिन्यापासून तेथे निर्यात होत आहे. आज भरलेला कंटेनर आठ दिवसांत जहाजाने दुबईत पोचतो. -मिनाज शेख, टोमॅटो निर्यातदार 



जुगार पीक म्हणून ओळख असलेल्या टोमॅटोचा असा हंगाम मी वीस वर्षांत पाहिला नाही. सातत्याने दर टिकून राहिल्याचे हे पहिलेच वर्ष आहे. रोज सहा कोटींची उलाढाल होत असतानाही व्यापारी व आडतदारांनी शेतकऱ्यांना उंच दर व रोख पेमेंट दिले. बाजार समितीचे पारदर्शक कामकाज व शेतकऱ्यांना सुविधा, यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा टोमॅटो विक्रीसाठी पिंपळगाव बाजार समितीला पसंती देतात. -आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com