अखेर आंबेवाडीतील खुनाला वाचा फुटलीच; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

गोपाल शिंदे
Friday, 9 October 2020

आरोपीने घटनेत मोबाईल वापरला नव्हता, शिवाय परिसरात पाऊस असल्याने श्वान पथकाला यश येत नव्हते, गुप्त खबऱ्यांकडून देखील यश न आल्याने संयुक्त कारवाई दरम्यान पोलिसांनी काही दिवस गावातच तळ ठोकत माहिती घेण्यास सुरवात केली.

नाशिक/घोटी : आंबेवाडी ( ता. इगतपुरी ) येथील ( ता. 6 ) रोजी झालेल्या खुनाला अखेर घोटी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत संशयित आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. कोणतेही धागेदोरे मागे न ठेवता मागील भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने खून केल्याने पोलीस तपासातून पुढे आले आहे.

गुन्हेगारी घटनांचा मोबाईलवर अभ्यास

संशयित आरोपी शांताराम पंढरी केकरे ( वय 27 ) व मयत शिवाजी दाशरथ केकरे ( वय 27 ) यांच्यात वर्षभरापूर्वी वेगवेगळ्या कारणांवरून हाणामारी झाली होती. यावरून मयत शिवाजी ह्याचा कायमचा काटा काढून टाकण्यासाठी आरोपीने गुन्हेगारी घटनांचा मोबाईलवर अभ्यास केला होता. यामुळे खून होवून आठवडा उलटला तरी देखील पोलिसांना मुख्य आरोपी पर्यंत पोहचण्यास यश येत नव्हते. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, विभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, अरुंधती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने जंगजंग पछाडत अखेर मुख्य आरोपीस जेरबंद केले.

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

अत्यंत हुशारीने केला होता खुन

मयत शिवाजी हा रेशन घेण्यासाठी ( ता. 6 ) तारखेला गावात आला होता. घराकडे रेशन घेवून जात असतांनात्याच्यावर पाळत ठेवत  अंधारत दबा धरून बसलेल्या शांताराम ह्याने माघून जावून मयत शिवाजी ह्यास खाली पाडत डोक्यात दगड घालत खून करत जंगलात आश्रय घेतला. आरोपीने घटनेत मोबाईल वापरला नव्हता, शिवाय परिसरात पाऊस असल्याने श्वान पथकाला यश येत नव्हते, गुप्त खबऱ्यांकडून देखील यश न आल्याने संयुक्त कारवाई दरम्यान पोलिसांनी काही दिवस गावातच तळ ठोकत माहिती घेण्यास सुरवात केली.

पळून जाताना दहा वर्षाच्या मुलाने पाहिले

यामध्ये दहा वर्षाच्या मुलाने आरोपीस पळताना रक्ताने माखेलेले कपड्यात पाहिले होते. यावरून आरोपीस पकडण्यासाठी दोन पथके निर्माण करण्यात आली होती. जंगल परिसर छाणून अखेर घनदाट झाडीत लपून बसलेला आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. या घटनेत एकूण सहा संशयितांची चौकशी करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली या पथकात उपनिरीक्षक अनिल धुमसे, पोलीस नाईक शीतल गायकवाड, संतोष दोंदे, भास्कर महाले, भास्कर शेळके, प्रकाश कासार, लहू सानप, राहुल साळवे काम केले.  

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested the accused in the murder nashik marathi news