ज्यांच्यासाठी चौकी बांधली 'त्या' पोलिसांनीच चौकी तोडली??...नागरिकांना आश्‍चर्याचा धक्काच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

ज्या पोलिसांसाठी लोकवर्गणीतून पोलिस चौकी बांधली, त्याच पोलिसांनी उद्‌घाटनापूर्वीच पोलिस चौकी तोडल्याचा प्रकार सिडकोत उघडकीस आला. त्यामुळे "ज्यांच्यासाठी बांधली, त्यांनीच तोडली' अशी लोकभावना निर्माण होऊन स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी पोलिसांच्या या कामाचा निषेध नोंदविला, तर नागरिकांचा विरोध झुगारत पोलिसांनी बांधकाम पाडले.

नाशिक : (सिडको) ज्या पोलिसांसाठी लोकवर्गणीतून पोलिस चौकी बांधली, त्याच पोलिसांनी उद्‌घाटनापूर्वीच पोलिस चौकी तोडल्याचा प्रकार सिडकोत उघडकीस आला. त्यामुळे "ज्यांच्यासाठी बांधली, त्यांनीच तोडली' अशी लोकभावना निर्माण होऊन स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी पोलिसांच्या या कामाचा निषेध नोंदविला, तर नागरिकांचा विरोध झुगारत पोलिसांनी बांधकाम पाडले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले. 

असा आहे प्रकार

खुटवडनगरला 2011 मध्ये येथील शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर जाधव व त्यांच्या मित्रमंडळाने पोलिसांच्या सोयीसाठी लोकवर्गणीतून पाच लाख रुपये खर्च करून म्हसोबा मंदिर येथे पोलिस चौकी उभारली होती. तेव्हापासून म्हणजे तब्बल नऊ वर्षांपासून पोलिस चौकी उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत होती. एक दिवस उद्‌घाटन होईल, या आशेवर येथील नागरिकही मोठी आशा लावून होते. परंतु एवढ्या वर्षात उद्‌घाटन तर झाले नाहीच; परंतु उद्‌घाटनावरून लोकप्रतिनिधींत वाद मात्र झाले. शनिवारी (ता. 22) सकाळी अचानक पोलिस चौकी अंबड पोलिसांनी बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकल्याने नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी चौकी पाडण्याला विरोध करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, सरकारी कामात हस्तक्षेप केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याने चौकी बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या श्री. जाधव यांनी पोलिसांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तात चौकीचे बांधकाम पाडले. 

हेही वाचा > मनात आईची भिती.. दोघींनी रात्र काढली बाकावर झोपून..अवघ्या दोन तासात पोलीसांची अ‍ॅक्‍शन!

लवकरच खुटवडनगर व शिवाजी चौक येथे नव्याने पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. तसेच पवननगर व त्रिमूर्ती चौक येथील पोलिस चौकीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळेच खुटवडनगर येथील पोलिस चौकी तोडण्यात आली आहे. - कुमार चौधरी (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे) 

2011 मध्ये लोकवर्गणीतून खुटवडनगर येथील पोलिस चौकी पाच लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली. उद्‌घाटन तर सोडाच, साधी दखलही पोलिस प्रशासनाने कधी घेतली नाही. चौकी तोडण्यापूर्वी कल्पना देणे गरजेचे होते. आतापर्यंत पोलिसांना सहकार्याची भावना होती. परंतु यानंतर पोलिसांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही. - सुधाकर जाधव, पदाधिकारी, शिवसेना  

हेही वाचा > बापरे! इथे तर फळभाज्या व्यापारीच कोरोना पॉझिटिव्ह..नाशिक अन् मुंबईच्या बाजारात होते जाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police broke up the police outpost nashik marathi news