शाब्बास 'गुगल'! घरफोडीतील संशयित हातमोजांवरून काही तासांतच जेरबंद; कामगिरीचं होतंय कौतुक

अरुण मलाणी
Wednesday, 23 September 2020

या वेळी संशयितासह आणखी चार-पाच लोक एका रांगेत उभे केले. संशयिताला कपडे बदलण्यासह हव्‍या त्‍या जागेवर उभे राहण्याची मुभा दिली. त्‍यानंतर गुगल श्र्वानाला आणले असता त्‍याने सर्वांचा वास घेत पुन्‍हा संशयिताकडे इशारा केल्‍याने त्‍याचे पितळ उघडे पडले.

नाशिक : अंबड परिसरातील खोडे मळा परिसरात झालेल्‍या घरफोडीदरम्‍यान राहून गेलेल्‍या हातमोजांवरून संशयिताला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यातून घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना काही अंशी यश आले. पोलिस दलातील गुगल या श्र्वानाने संशयिताचा मागोवा घेत छडा लावला आहे. 

पोलिसांच्या गुगल श्र्वानाने लावला छडा 

खोडे मळा भागात घरफोडीचा गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर श्र्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पाहणी करत असताना, घटनास्‍थळी हातमोजा आढळला. घरातील सदस्‍यांकडे चौकशी केली असता, हा मोजा घरातील सदस्‍याचा नसल्‍याचे सांगण्यात आले. याचा आधार घेत गुगल श्र्वानाला वास देत मागोवा घेण्याच्‍या सूचना केल्‍या. घराच्‍या गेटने बाहेर नेऊन पुन्‍हा मागील बाजूने शेतीच्‍या रस्‍त्‍याने पुढे जाऊन त्‍यानंतर खोडे मळा, बडदेनगरमार्गे अडगळीच्‍या रस्‍त्‍याने गुगल पळत सुटला. शेवटी इंदिरा गांधी वसाहत, झोपडपट्टी येथील महादेव मंदिराच्‍या बाजूच्‍या गल्‍लीतील एका कोपऱ्या‍तील अडगळीच्‍या घरात घुसला. तेथील संशयित व्‍यक्‍तीवर भुंकायला सुरवात केली. संबंधिताला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

ओळखपरेडमध्येही पितळ उघड 

संशयिताने विरोध केल्‍यानंतर पोलिसांनी ओळखपरेड घेण्याचा निर्णय घेतला. या वेळी संशयितासह आणखी चार-पाच लोक एका रांगेत उभे केले. संशयिताला कपडे बदलण्यासह हव्‍या त्‍या जागेवर उभे राहण्याची मुभा दिली. त्‍यानंतर गुगल श्र्वानाला आणले असता त्‍याने सर्वांचा वास घेत पुन्‍हा संशयिताकडे इशारा केल्‍याने त्‍याचे पितळ उघडे पडले. ही कामगिरी श्‍वानपथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. बी. मोरे, श्‍वान हस्‍तक गणेश कोंडे, अरुण चव्‍हाण, नाईक यांनी पार पाडली.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police caught the burglary suspect with the help of a dog nashik marathi news