धक्कादायक! 'या' कामात पोलिसच आघाडीवर...अनेकांचा हा भ्रम मोडला!

nashik police 09.jpeg
nashik police 09.jpeg

नाशिक : सर्वाधिक भ्रष्ट आणि गैरप्रकार होणारा विभाग कोणता, असा प्रश्‍न पडला तर उत्तर मिळते ते महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभाग. अगदी एजंट नेमून काही ठिकाणी कामे होतात. त्यामुळे सहाजिकच या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा असाच आहे. पण पोलिस खात्याने मात्र अनेकांचा हा भ्रम मोडीत काढला असून, 2019 या संपूर्ण वर्षात राज्यात लाच घेण्याची सर्वाधिक प्रकरणे पोलिस खात्याची घडली आहेत. कधी महसूल, तर कधी पोलिस खाते पहिल्या क्रमांकाला राहत असल्याने जणू पहिल्या क्रमांकासाठी या दोन्ही विभागांत स्पर्धाच सुरू आहे. 

पोलिसांच्या सर्वाधिक घटना नोंद

भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अत्यंत प्रामाणिकपणे अंमलबजावणी करत असल्याने पोलिस असो की कारकून, अतिशय गुप्तरित्या सापळा लावून लाच घेणाऱ्याला रंगेहात पकडले जाते. याचमुळे पोलिसांच्या सर्वाधिक घटना नोंद झाल्या आहेत. आतापर्यंत महसूल विभागाला सर्वाधिक लाचखोर म्हटले जायचे; परंतु आता त्याच्याही पुढे पोलिस विभाग जात आहे. लाचलुचपत विभागाने विश्‍वासार्हता जपल्याने अन्‌ कायद्याची माहिती समजू लागल्याने आता नागरिक कोणत्याही विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करायला पुढे सरसावू लागले आहेत. नागरिकांच्या जागरूकतेमुळेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना जरब बसत असला तरी सातत्याने घटना घडूनही फुकटचे खाण्याची सवय लागलेले मात्र लाच घेतच आहेत. लाचच्या घटनांची वर्गवारी पाहता प्रथम श्रेणीत लाचखोर अधिकाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र श्रेणी तीनमध्ये सर्वाधिक कर्मचारी लाचखोर असल्याचे आकडे सांगतात. 

...अशी आहे तफावत 
राज्यात 2018 मध्ये महसूल विभागातील 218 प्रकरणांत 274 कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई केली होती, तर पोलिसांवर 197 प्रकरणांत 262 व्यक्तींवर कारवाई झाली. दोन्ही विभागांच्या प्रत्येकी 11 जणांवर दोष सिद्ध झाले होते. मात्र 2019 मध्ये महसूल विभागाला मागे टाकत पोलिसांनी भ्रष्टाचारात बाजी मारली आहे. सरत्या वर्षात महसूल विभागात 190 प्रकरणांत 259 व्यक्ती अडकल्या, तर पोलिसांनी मात्र प्रथम क्रमांक पटकावत 194 गुन्ह्यांत 269 व्यक्तींवर कारवाई झाली असून, यात अधिकारी केवळ 24, तर पोलिस कर्मचारी 245 आहेत. गेल्या वर्षी 17 पोलिस आणि 15 महसूल कर्मचाऱ्यांचे दोष सिद्ध झाले आहेत. 

यापूर्वी 2016 मध्ये पोलिस नंबर वन 
याअगोदर 2016 मध्ये देखील सर्वाधिक प्रकरणात पोलिस अडकले होते. त्या वेळी 228 प्रकरणांत 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई, तर महसूल विभागाच्या 229 प्रकरणांत 270 व्यक्ती अडकल्या होत्या. महसूलच्या 32 व पोलिसांच्या 26 कर्मचाऱ्यांवर दोष सिद्ध झाले होते. पुन्हा 2017 मध्ये महसूल विभाग टॉपला राहिला. त्या वेळी महसूलच्या 207 प्रकरणांत 278 कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांच्या 170 प्रकरणांत 222 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. 

महसूलला मागे टाकत 2019 मध्ये पोलिस विभाग आघाडीवर 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलिस खात्याशी निगडित असला तरी आमच्या दृष्टीने जशी तक्रार होईल तशी कारवाई करण्यालाच प्राधान्य असते. सर्वाधिक सापळे पोलिसांचे झाले म्हणजे आमच्या विभागाचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. आम्ही कुठलाही भेदभाव करीत नाही. सर्व सरकारी नोकर समान असून, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही काम करतो. नागरिकांनी लाचच्या प्रकरणात तक्रारीसाठी पुढे येऊन आमच्या विभागाशी संपर्क साधावा. - सुनील कडासने, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र 

वर्षागणिक लाचचे उघड गुन्हे... 
प्रकार ---- 2015 ---- 2016 ---- 2017--- 2018---- 2019 
सापळा - 1234 - 985 - 875 - 891 - 867 
असंपदा - 35 - 17 - 22 - 22 - 20 
अन्य भ्रष्टाचार - 10 - 14- 28 - 23 - 5 
एकूण गुन्हे - 1279 - 1016 - 925 - 936 - 892 

2019 मधील लाच घेणारे टॉपर 
विभाग - प्रकरणे - कर्मचारी 
महसूल, भूमिअभिलेख - 190 - 259 
पोलिस - 194 - 269 
महावितरण - 47 - 62 
मनपा - 47 - 64 
जिल्हा परिषद - 34 - 44 
पंचायत समिती - 90 -120 
वन - 19 - 25 
आरोग्य - 27 - 35 
शिक्षण - 29 - 45 
सहकार - पणन - 25 
जलसंपदा - 16 - 20 
नगर परिषद - 16 - 25 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com