आता पोलीसचं असं वागले तर..शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी यायचं की नाही?

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 January 2020

नाशिकपासून शंभर किलोमीटरवर शिर्डी देवस्थान आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी सातत्याने राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने येत असतात. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील भाविक नाशिकमार्गे वाहनाने शिर्डीकडे जातात. त्यांच्या वाहनांच्या क्रमांकांवरूनच परराज्यातील वाहनांची ओळख पटते. शनिवारी दर्शनासाठी शिर्डीत आलेले भाविक रविवारी (ता.19) सकाळी पुन्हा नाशिकच्या दिशेने निघाले असता..

नाशिक : शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या परराज्यातील वाहनांची सिन्नर एमआयडीसी जवळच ग्रामीण वाहतूक पोलिसांकडून अडवणूक करून दिवसाढवळ्या "वसुली' केली जात आहे. शनिवारी-रविवार असल्याने भाविकांची गर्दी असल्याने त्याचा फायदा घेत भल्या सकाळपासूनच वाहतूक शाखेच्या वाहनासह आठ-दहा पोलिसांकडून परराज्यातील वाहनांना टार्गेट केले जात आहे. पोलिसांच्या या कारनाम्यामुळे परराज्यातील भाविकांमध्ये तीव्र नाराजी असून, "देवदर्शना'साठी यावे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडवणूक

नाशिकपासून शंभर किलोमीटरवर शिर्डी देवस्थान आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी सातत्याने राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने येत असतात. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील भाविक नाशिकमार्गे वाहनाने शिर्डीकडे जातात. त्यांच्या वाहनांच्या क्रमांकांवरूनच परराज्यातील वाहनांची ओळख पटते. शनिवारी दर्शनासाठी शिर्डीत आलेले भाविक रविवारी (ता.19) सकाळी पुन्हा नाशिकच्या दिशेने निघाले असता, परराज्यातील वाहनांना सिन्नर शहर सोडल्यानंतर एमआयडीसीजवळ आठ ते दहा नाशिक ग्रामीणच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून अडविले जात होते. यात कार, मिनी बस, लक्‍झरी अशी वाहने होती. वाहनातील प्रवासी वा वाहनचालकांकडील कागदपत्रांची पूर्तता असतानाही अडविणाऱ्या पोलिसांकडून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव अडवणूक केली जात होती. त्यासाठी पैशांची मागणी केली जात होती. वाहनचालकांकडून चिरीमिरी घेतल्यानंतर वाहने नाशिकच्या दिशेने सुटत होती. 

आम्हाला नेहमी हाच अनुभव
परराज्यातून येणाऱ्या वाहनांनाच रोखले जाते. भाविकांवर हा एकप्रकारे पोलिसांकडून सुरू असलेला अन्याय आहे. शंभर-दोनशे रुपये दिले, तर काही प्राब्लेम नाही. नाही दिले तर वाहन रोखून ठेवायचे. हा कोणता प्रकार आहे? देशात कुठेही असला प्रकार नाही. याच ठिकाणचा आम्हाला नेहमी हाच अनुभव येतो. - गोपी, भाविक (गुजरात) 

हेही वाचा > लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

महामार्ग पोलिस की ग्रामीण 
शिर्डी-सिन्नर मार्गावर सिन्नर एमआयडीसी, वावी, पाथरे याठिकाणी वाहनांसह थांबलेले वाहतूक पोलिसांच्या वेशातील हे पोलिस महामार्ग पोलिस आहेत की नाशिक ग्रामीण वाहतूक पोलिस शाखेचे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. विचारल्यानंतरही ते नाशिक पोलिस एवढेच सांगतात. त्यातही महामार्ग की ग्रामीण वाहतूक शाखा विचारल्यानंतरही ते उत्तर न देता उलट विचित्र नजरेने पाहत आपली कारवाई सुरूच ठेवतानाचे चित्र रविवारी बघावयास मिळाले. 

हेही वाचा > "ते" नकळत व्हायरल करायचे पोर्नोग्राफी व्हिडिओ...अचानक..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police troubles to devotees at Shirdi Nashik Marathi News