
नाशिक : (मालेगाव) आशिया खंडातील टाकाऊ प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे सर्वांत मोठे हब आहे. शहरात रोज सुमारे 800 टन, तर दरमहा सुमारे 24 हजार टन प्लॅस्टिक प्रक्रियेसाठी येते. शिवाय नागरिक वापरणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, उत्पादने व कचरा वेगळाच.
सात ते आठ टन प्लॅस्टिक कचऱ्याचा समावेश
शहरात रोज सुमारे 300 टन कचरा जमा होतो. यात सात ते आठ टन प्लॅस्टिक कचऱ्याचा समावेश असतो. दरमहा सुमारे सहा हजार टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया (रिसायकलिंग) करून गिट्टी, शेतीपयोगी पाइप, प्लॅस्टिक दाणा व अन्य उत्पादने तयार होतात. या क्षेत्रातून तब्बल 25 हजार जणांना रोजगार उपलब्ध होतो. तथापि, प्लॅस्टिक गुदाम व कारखाने सर्व शहरांतील संमिश्र वस्ती व निवासी भागाला लागून असल्याने प्लॅस्टिकचा भस्मासुर जटिल झाला आहे. प्लॅस्टिक प्रदूषणामुळे शहरात विविध आजारांनी पाय पसरले आहेत. राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी परिपूर्ण नाही.
हब हा नावलौकिक आता मोठी भळभळती जखम वाटू लागली
प्लॅस्टिक प्रदूषणाने पाय पसरल्याने येथील नदीपात्र, नाले, गटार, रस्ते आदी सर्व प्लॅस्टिकने व्यापले आहेत. शहराजवळील म्हाळदे शिवारातील मैला डेपोवर (डम्पिंग ग्राउंड) प्लॅस्टिक कचऱ्याचे साम्राज्य आहे. प्लॅस्टिक पिशवी विघटनास तब्बल साडे चारशे वर्षे लागतात. पूर्ण प्लॅस्टिक विघटनासाठी हजार वर्षे लागतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 19 व्या शतकात न्यू र्याकमध्ये प्लॅस्टिकचा शोध लागला. आता या भस्मासुराने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. सर्वांत मोठे प्रक्रिया हब हा नावलौकिक आता मोठी भळभळती जखम वाटू लागली आहे. प्लॅस्टिकमुक्त मालेगावसाठी मोहीम राबविणे, जनजागृती करणे, निवासी वस्तीत असलेले कारखाने, गुदाम औद्योगिक क्षेत्रात स्थलांतर करणे, एकाच ठिकाणी केंद्रित प्लॅस्टिक पार्क साकारणे, दैनंदिन वापरात कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे यांसह विविध उपाययोजना केल्यास प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालताना स्वच्छ, सुंदर मालेगावलाही हातभार लागेल.
विविध सायजिंगच्या चिमण्यांमधून काळाकुट्ट धूर बाहेर
शहरात येणाऱ्या सर्व प्लॅस्टिकवर प्रक्रिया होत नाही. शिवाय खाद्यपदार्थांचे वेष्टण, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, अन्य प्लॅस्टिक उत्पादने असा टाकाऊ कचरा येथील सायजिंगमध्ये बॉयलरसाठी सर्रासपणे जाळला जातो. सायजिंगमध्ये प्लॅस्टिक कचरा जाळल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याविरुद्ध येथील कलीम अब्दुल्ला यांनी राष्ट्रीय हरित लवादात आवाज उठविल्यानंतर जुजबी कारवाई करताना दोन-तीन सायजिंग सील करण्यात आल्या. प्रदूषणामुळे शहरासह भावी पिढीला धोका आहे, ही बाब लक्षात घेऊन सायजिंग मालकांनी प्लॅस्टिक जाळणे बंद केले पाहिजे. पूर्व भागात विविध सायजिंगच्या चिमण्यांमधून काळाकुट्ट धूर बाहेर पडतो. त्याचा उग्र दर्प येतो.
प्लॅस्टिक प्रदूषण गंभीर स्वरूप धारण
जुन्या महामार्गाने शहराबाहेरून गेल्यास प्लॅस्टिकचा कचरा नजरेस पडल्यास व उग्र दर्प आल्यास प्रवाशांना मालेगाव आल्याची जाणीव होते. या सर्व बाबींना छेद देणे गरजेचे आहे. येथील मोसम नदीचे एक किलोमीटर पात्रही प्लॅस्टिक कचऱ्याने व्यापले आहे. येथील जल, मल, वायुप्रदूषणाबरोबरच प्लॅस्टिक प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करीत आहे.