अखेर सापडलेच कोंबडीचोर! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश; काय घडले?

अजित देसाई
Tuesday, 8 September 2020

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या भरून मुंबईला जाणाऱ्या पिक-अप चालकास नांदूरशिंगोटे- वावी रस्त्यावर अडवून चाकूचा धाक दाखवून तब्बल ६०० कोंबड्या लुटल्याची घटना घडली.. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.

नाशिक / सिन्नर : नांदूरशिंगोटे- वावी रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी पिक-अप चालकास चॉपरचा धाक दाखवून ६०० कोंबड्या चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने पर्दाफाश करत म्होरक्यासह चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर वावी पोलिसांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीच दोघांना ताब्यात घेतले आहे. काय घडले?

सराईत कोंबडीचोर टोळीचा पर्दाफाश 
प्रवीण कांदळकर ऊर्फ भय्या (वय २१, रा. शहा, ता. सिन्नर), चैतन्य शिंदे, (१९), रवींद्र शिरसाठ, आकाश शिंदे (तिघे रा. पांगरी, ता. सिन्नर), अमर कापसे (१८) व विवेक खालकर (१८, दोघेही रा. भेंडाळी, ता. निफाड) अशी या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या भरून मुंबईला जाणाऱ्या पिक-अप चालकास नांदूरशिंगोटे- वावी रस्त्यावर अडवून चाकूचा धाक दाखवून ६०० कोंबड्या लुटल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वावी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने केलेल्या समांतर तपासादरम्यान या टोळीचा छडा लावण्यास सुरवात केली होती. चोरलेल्या कोंबड्या रवींद्र शिरसाठ,आकाश शिंदे यांनी विकत घेतल्याचे समजल्याने वावी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अन्य साथीदारांची नावे सांगितली.

पुढील कारवाईसाठी वावी पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांचा माग काढत नाशिक शहरातील जत्रा हॉटेल परिसरातून प्रवीण कांदळकर उर्फ भय्या याच्यासह चौघांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी वावी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, रोकड, धारदार चॉपर असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर शिरसाठ व शिंदे यांना दुसऱ्याच दिवशी वावी पोलिसांनी सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली अटक केली होती. 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न 
शनिवारी (ता. ५) सायंकाळी शहा परिसरात या प्रकरणातील मुख्य संशयित भय्या कांदळकर याच्या शोधात पोलिस पथक पोचले. गावातील बिरोबा मंदिर परिसरात दडून बसलेल्या भय्याला शरण येण्यास सांगितल्यावर त्याने हवालदार दशरथ मोरे यांच्यावर चॉपरने वार केला. हा हल्ला मोरे यांनी हुकवला. मात्र, भय्या पळून जाण्यास यशस्वी ठरला होता. त्याने वापरलेला चॉपर पोलिसांनी ताब्यात घेतला होता.  

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poultry thieves gang exposed by police nashik marathi news