'येथे' तब्बल ७ तास वीजपुरवठा खंडित; डॉक्टरांसह कोरोना रुग्णांची घालमेल

संजीव अहिरे
Wednesday, 16 September 2020

सीडीएचएसडीचा दर्जा या रुग्णालयास असल्यामुळे मनमाड व ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन बेड असल्याने व मालेगाव येथील कोरोना नियंत्रणात भूमिका बजावणारे डॉ. बोरसे यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय सेवा मिळत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पसंती मिळते.

नाशिक/नांदगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. तालुक्यातील ते एकमेव रुग्णालय आहे. ऑक्सिजनसह अन्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे सध्या या रुग्णालयात एकूण चाळीसहून अधिक रुग्णांवर डॉ. रोहन बोरसे व त्यांची टीम उपचार करीत आहे. अशात नांदगावमध्ये विजेचा लपंडाव झाल्याने कोरोना रुग्णांसह डॉक्टरांचीही घालमेल झाली होती. 

वीजपुरवठा वारंवार खंडित

सीडीएचएसडीचा दर्जा या रुग्णालयास असल्यामुळे मनमाड व ग्रामीण भागातील रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन बेड असल्याने व मालेगाव येथील कोरोना नियंत्रणात भूमिका बजावणारे डॉ. बोरसे यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय सेवा मिळत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पसंती मिळते. मात्र दोन दिवसांपासून रुग्णालयाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उपचारासाठी दाखल रुग्णांची घालमेल होत आहे. पंखे बंद असल्यामुळे उपचारासाठी रुग्णांची अस्वस्थता वाढीला लागून ऑक्सिजन पातळीवर त्याचा परिणाम झाला. अनेकांनी कर्मचाऱ्यांची मदत मागितली. मात्र सलग सात तास वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटरही बॅकअप देत नव्हता. यामुळे डॉक्टरांची मोठी धावपळ उडाली. वारंवार खंडित वीजपुरवठा सुरळीत कधी होणार यासाठी विचारणा केली तर सबस्टेशनचा फोन बंद. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याचा खुलासा नेमकेपणाने होण्याऐवजी संभ्रमात भर पडली. शेवटी एकदाचा वीजपुरवठा सुरू झाला अन् डॉक्टरांसह रुग्णांनाही हायसे वाटले. याच भागातील एका ठिकाणी वीजवाहक यंत्रणेत मधमाश्यांचे पोळ काढण्यासाठी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारचा दिवस अघोषित लोडशेडिंगचा ठरला. एकीकडे कोरोनाबाधित, दुसरीकडे असह्य होणारा उकाडा यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

नवीन फीडरच्या कामासाठी वीज बंद 

शहरातील वीज वितरण व्यवस्थेचे दोन भाग करण्यात आले असून, मालेगाव रोडपासून मुख्य शहराचा भाग एक, तर रेल्वे फाटकाबाहेर औरंगाबाद रोड, येवला रोड भाग दोन असे विभाजन आहे. नुकतेच नव्या प्रशासकीय इमारतीमागे भाग दोनसाठी स्वतंत्र फीडर सुरू झाले. त्याच्या कामासाठी हा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उपविभागीय अभियंता वाटपाडे यांनी दिली. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power outage for seven hours in a row in nandgaoan nshik marathi news