नेमके रहस्य काय? "अंबडगाव" जिथे एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही...चर्चेचा विषय

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 6 August 2020

संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातलेला असताना अंबडगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. अंबडगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे नेमके रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक / सिडको : संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातलेला असताना अंबडगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. अंबडगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे नेमके रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात कोरोनाबाधितांचा आकडा रोज वाढत आहे. त्यात काही मृत्युमुखीही पडत आहेत. मात्र एक हजार लोकसंख्या असलेल्या अंबडगावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

कोरोनाला रोखण्यात यश, परिसरात चर्चेचा विषय 

दोन शतकांपासून अंबडगावात कोणत्याही महामारीने प्रवेश केलेला नाही, असा दावा येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मग ती पटकी असेल, मानमोडी असेल, प्लेग असेल किंवा दुष्काळ असेल. अनेकांचे म्हणणे आहे, की स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यात अंबडचे नागरिक नेहमीच पुढे असतात. तर काही जण म्हणतात, की ग्रामस्थांचा सकस आहार, नियमित व्यायाम आणि शेतीची कामे यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमता कारणीभूत आहे. यापैकी कारण काहीही असो; पण गावाने ही परंपरा कायम राखल्याने सध्या हा कौतुकाचा विषय ठरत आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

गावातील जुनी मंडळी असो वा नवी मंडळी, त्यांचा सकस आहार आणि त्यांच्यातील रोगप्रतिकार क्षमता हीच या आजारांना पळवून लावते. - खंडेराव दातीर 

१९७२ च्या दुष्काळातही गावात दुष्काळ बघायला मिळाला नाही. गावात असलेली जिवंत झऱ्याची विहीर त्या वेळी तुडुंब भरलेली होती. या विहिरीचे पाणी म्हणजे एक संजीवनीच मानले जाते. - उत्तम मटाले 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यात आली. आतापर्यंत २११ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या. परंतु एकही कोरोनाबाधित आढळला नाही. गावातील लोकांनी घेतलेली काळजी हेच यामागील कारण आहे. - राकेश दोंदे, नगरसेवक 

सिडको परिसरात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह संख्या एक हजार ६०६ झाली आहे. त्यात ८४२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, बरे झालेले रुग्ण ७६४ आहेत. अद्याप अंबडगावात एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. अंबडगाव परिसरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या मात्र १७ असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. - डॉ. दीपिका मोरे, वैद्यकीय अधिकारी, सिडको 

रिपोर्ट - प्रमोद दंडगव्हाळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: preventing the spread of corona in Ambadgaon nashik marathi news