खासगी डॉक्‍टरांच्‍या प्रश्‍नांबाबत 'आयएमए' नाशिक शाखेचे आठवड्याभराचे अल्‍टिमेटम; अन्यथा आंदोलन

अरुण मलाणी
Tuesday, 15 September 2020

आगामी आठवड्याभरात शासनाने डॉक्‍टरांच्‍या मागण्यांबाबत लक्ष न घातल्‍यास खासगी डॉक्‍टर काम बंद आंदोलन पुकारतील, अशी भुमिका इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी जाहीर केली आहे

नाशिक : एकीकडे ऑक्‍सिजन, औषधांच्‍या दरांबाबत कुठल्‍याही स्‍वरूपाचे नियंत्रण नाही, तर दुसरीकडे कॉविड-१९च्‍या उपचाराबाबत कॅपिंग केली जाते आहे. नॉन-कोविड उपचारांसाठीदेखील नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीचा हस्‍तक्षेप वाढतो आहे. वेळोवेळी विविध बाबी निदर्शनात आणूनदेखील शासनाकडून खासगी डॉक्‍टरांना विश्र्वासात न घेता, एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. आगामी आठवड्याभरात शासनाने डॉक्‍टरांच्‍या मागण्यांबाबत लक्ष न घातल्‍यास खासगी डॉक्‍टर काम बंद आंदोलन पुकारतील, अशी भुमिका इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी जाहीर केली आहे. 

लेखापरिक्षणाचा अट्टहास डॉक्‍टरांचे खच्चीकरण करणारा

मंगळवारी (ता.१४) ऑनलाइन स्‍वरूपात झालेल्‍या पत्रकार परीषदेत त्‍यांनी विविध मुद्यांची माहिती दिली. यावेळी डॉ.चंद्रात्रे म्‍हणाले, की राज्‍यस्‍तरावरील पदाधिकार्यांशी चर्चेनंतर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्‍या कुचकामी धोरणामुळे जनरल प्रॅक्‍टीशनर्सलादेखील कोरोनाची लागण होत असल्‍याने त्‍यांच्‍याकडूनदेखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविलेला आहे. नॉन-कोविड उपचारावरही नाशिक महापालिकेच्‍या स्‍थायी समितीमार्फत लेखापरिक्षणाचा अट्टहास डॉक्‍टरांचे खच्चीकरण करणारा आहे. जैवीक कचरा (बायोमेडिकल वेस्‍ट) दराचा प्रश्‍न प्रलंबित आहे. ऑक्‍सीजन, औषधे यांच्‍या दरावर कुठलीही कॅपिंग नसतांना, केवळ उपचारावर निर्बंध आणून डॉक्‍टरांना आरोपी ठरविण्याचे प्रकार त्‍वरीत बंद झाले पाहिजे, अशी संघटनेची भुमिका आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

शासनाने रूग्‍णालये चालवायला घ्यावीत 

पाठपुराव्‍यानंतरही शासनाकडून खासगी डॉक्‍टरांच्‍या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु आता परीणामांचा विचार न करता ठोस भुमिका घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. खासगी रूग्‍णालये शासनाने चालवायला घ्यावी, सर्व व्‍यवस्‍थापन सांभाळावे, कर्मचार्यांचा पगार करावा, आम्‍हीदेखील शासनाच्‍या अधिपत्‍याखाली नोकरीच्‍या रूपाने सेवा देण्यास तयार आहोत, असे खुले आवाहन डॉ. चंद्रात्रे यांनी केले. दरम्‍यान आंदोलनाच्‍या पार्श्र्वभुमिवर रूग्‍णालात नव्‍याने रूग्‍ण दाखल करून घ्यायचे का, याबद्दल विचारविनिमय सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमधील प्रादुर्भाव लक्षात घेता, चर्चेनंतर याबाबत अंतीम निर्णय घेतला जाणार असल्‍याचेही डॉ. चंद्रात्रे यांनी स्‍पष्ट केले. 

 
संघटनेतर्फे मास्‍क मस्‍ट मोहिम 

यापूर्वी आयएमएतर्फे षटसूत्री जाहीर केलेली होती. यातील सूचनांचे काटेकोर पालन झाले असले तर कोरोनाचा इतक्‍या मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नसता. सध्याची परीस्‍थिती लक्षात घेता मास्क मस्‍ट ही मोहिम राबविली जाते आहे. महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी यांना पत्र देत प्रत्‍येकाला मास्‍कचा सक्‍तीने वापर करण्यासंदर्भात विनंती केली जाणार आहे. तसेच मास्‍क न वापरणार्यांवर अधिक कठोरपणे कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्‍याचेही श्री. चंद्रात्रे यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private doctors will call a strike nashik marathi news