अखेर मालेगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली...हे आहे कारण

malegaon.jpg
malegaon.jpg

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील मृतसाठा धरून ११ हजार ६१० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. धरण ५४ टक्के भरले आहे. शहराला गिरणा व चणकापूर अशा दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होतो. चणकापूरचे पाणी तळवाडे साठवण तलावात साठविले जाते. गिरणातील जलसाठा पाहता मालेगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. 

पाणी आरक्षणाची मागणी 

पिण्यासाठी रोज ६५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यातील ३० टक्के पाणी तळवाडे तलावातून, तर ७० टक्के पाणी गिरणा धरणातून उचलले जाते. महापालिका हद्दीत ३९ जलकुंभ आहेत. यातून संपूर्ण शहरात ४१९ झोनद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सर्व जलकुंभ कार्यरत असल्याने व जलवाहिन्या बदलल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या फारशा तक्रारी नाहीत. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे चाळीसगाव फाट्यावरील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी येते. तेथून पुन्हा ते येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोचते. गिरणा धरणातून महापालिका दर वर्षी ९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करते. शासनाकडून ६०० ते ७०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होते. साधारणत: वर्षाला गिरणातील ६०० दशलक्ष घनफूट पाणी महापालिका उचलते. 

मालेगावसाठी एकत्रित आवर्तन 

चणकापूर धरणातून मालेगावला पिण्यासाठी तीन ते चार आवर्तने मंजूर होतात. कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांबरोबरच मालेगावसाठी एकत्रित आवर्तन सोडले जाते. आवर्तनाचे पाणी गिरणा नदीतून डाव्या कालव्याद्वारे तळवाडे तलावात साठविले जाते. तेथून जलवाहिनीद्वारे येथील जलशद्धीकरण केंद्रात पाणी येते. तळवाडे साठवण तलावाची क्षमता विस्तारीकरणानंतर ८७ दशलक्ष घनफूट झाली आहे. जवळपास पाच ते सहा महिने तलावाला पूरपाण्याचा फायदा होतो. महापालिका तळवाडे तलावातून रोज पंधरा ते अठरा, तर गिरणा धरणातून ४० ते ४५ दशलक्ष लिटर पाणी उचलते. 

दिवसाआडच पाणीपुरवठा शक्य 

मुबलक पाणी असले तरी येथील वितरण व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे शहरातील विविध झोनमध्ये पाणीपुरवठा करताना चोवीस तासांचे नियोजन करावे लागते. त्यामुळे अनेक भागांत रात्री- मध्यरात्री, पहाटे पाणीपुरवठा होतो. नागरी वस्त्यांमध्ये नळाद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा करणारे मालेगाव कदाचित एकमेव शहर असेल. येथील वितरण व्यवस्था पाहता रोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. परिणामी कितीही पाणी उपलब्ध झाले तरीदेखील शहरवसीयांना दिवसाआडच पाणीपुरवठा होऊ शकतो. 

पाण्याचा अपव्यय टाळा 

महापालिका हद्दीत नवीन वसाहती वाढल्यामुळे झोनची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन मालेगाव मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सचिन माळवाळ यांनी केले आहे. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com