प्रस्ताव मंजूर, पण बांधकाम कधी? 'इथल्या' शाळांच्या धोकादायक वर्गखोल्या बांधकामाच्या प्रतीक्षेतच!

राजेंद्र दिघे
Tuesday, 18 August 2020

तालुक्यातील १३ शाळांचा निर्लेखन प्रस्ताव या शाळांची पडझड व जीर्ण झाल्याने मंजूर आहेत. आता या शाळांच्या ६४ वर्गखोल्या बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात संबंधित प्रस्तावानुसार नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम संधी मानून करणे गरजेचे असताना, ही कामे रखडली आहेत. 

नाशिक : (मालेगाव कॅम्प) शहर व परिसरातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. तालुक्यातील १३ शाळांचा निर्लेखन प्रस्ताव या शाळांची पडझड व जीर्ण झाल्याने मंजूर आहेत. आता या शाळांच्या ६४ वर्गखोल्या बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात संबंधित प्रस्तावानुसार नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम संधी मानून करणे गरजेचे असताना, ही कामे रखडली आहेत. 

शाळांच्या ६४ वर्गखोल्या धोकादायक 

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २९७ प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक शाळांच्या इमारती सुस्थितीत व सोयीसुविधांयुक्त आहेत. तेरा शाळांच्या इमारतींमधील काहींना शंभर वर्षे झाले. जीर्ण व धोकादायक ठरलेल्या ६४ वर्गखोल्यांची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानिक पातळीवर शिक्षक पर्यायी व्यवस्था करून शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने दुबार सत्रात शाळा भरवली जाते. बांधकाम जीर्ण झालेल्या अशा इमारतींचे निर्लेखन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनेनुसार हिसवाळ, सातमाने, देवारपाडे, चौकटपाडे, कळवाडी, मळगाव खाकुर्डी, अस्ताणे, मोठे टिपे, झोडगे (मुली), टेहेरे, लुल्ले, लखाने या शाळांच्या ६४ वर्गखोल्या धोकादायक असल्याने संबंधित मुख्याध्यापकांनी प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागास पाठविले आहेत. 

उर्वरित खोल्यांचे बांधकामे मार्गी लावावेत

तालुक्यातील अनेक नादुरुस्त व कौले उडालेल्या खोल्यांच्या छतावर कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निधीतून पत्रे टाकली आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळा इमारतींचे निर्लेखन प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले. या निर्लेखित प्रस्तावांची दखल घेत इमारत व दळणवळण विभागाने बांधकामांचे मूल्यांकन करून आराखडा तयार करणे अपेक्षित होते. यामधील खाकुर्डी, झोडगे, अस्ताने प्रत्येकी चार, देवारपाडे येथील एक, अशा १३ वर्गखोल्यांचे नवीन बांधकामे सुरू आहेत. सध्या शाळा बंद असल्याने या उर्वरित खोल्यांचे बांधकामे मार्गी लावावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधी व पालकांनी केली आहे. 

धोकादायक शाळांतील निर्लेखित वर्गखोल्या 

टेहेरे- आठ, सातमाने- तीन, देवारपाडे- पाच, चौकटपाडे- चार, कळवाडी- नऊ, मळगाव- चार, खाकुर्डी- सहा, झोडगे (मुली)- पाच, अस्ताने- सहा, हिसवाळ- सात, टिपे (मोठे)- दोन, लुल्ले- तीन, लखाने - दोन अशा एकूण ६४ वर्गखोल्या आहेत. 

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

वर्गखोल्यांअभावी दोन सत्रांत शालेय नियोजन करावे लागले आहे. सध्या तात्पुरती व्यवस्था केली आहे. प्रशासनाने निर्लेखन प्रस्ताव मंजूर शाळा खोल्यांचे काम त्वरित करावे. - विनोद देसले, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती 

जुन्या व जीर्ण झालेल्या खोल्यांचा कुठेही वापर होत नाही. इतर वर्गखोल्यांत पर्यायी व्यवस्था असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. - एस. के. वाघ, गटशिक्षणाधिकारी, मालेगाव  

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

(संपादन - किशोरी वाघ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal approved, but when construction? Waiting for thirteen schools in Malegaon taluka nashik marathi news