कोरोनामुळे अतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक अडचणीत; मंडप डेकोरेटर्स असोसिएशनची आर्थिक मदतीची मागणी

योगेश मोरे 
Friday, 9 October 2020

कोरोनामुळे देशांतर्गत सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. अतिथ्य आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सामाजिक, धार्मिक, वैवाहिक, राजकीय आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले.

नाशिक/म्हसरूळ : कोरोना संकटात आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या अतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) आणि तत्सम क्षेत्रांतील व्यावसायिकांना केंद्र सरकारच्या राहत पॅकेजअंतर्गत मदत करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी दिली. 

व्यावसायिक मानसिक तणावाखाली

कोरोनामुळे देशांतर्गत सर्वच व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. अतिथ्य आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सामाजिक, धार्मिक, वैवाहिक, राजकीय आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स, लाइट डेकोरेटर्स, बॅन्ड, ढोल, डीजे, साउंड सिस्टिम, इव्हेंट मॅनेजमेंट आदी सेवा देणाऱ्या व्यवसायांवर विपरित परिणाम झाला. जिल्ह्यातील लाखो लोक रोजगारापासूनही दूर आहेत. या कारणामुळे असंख्य व्यावसायिक मानसिक तणावाखाली आहेत. 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

लाखो कुटुंब आर्थिक विवंचनेत

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमती दर्शवणे अशक्य आहे. त्यामुळे साधा खर्चही निघत नाही. याचाच परिणाम म्हणजे मोठ्या कार्यक्रमांअभावी व्यावसायिकांचे अर्थचक्र थांबले आहे. त्यामधून लाखो कुटुंब आर्थिक विवंचनेत आहेत म्हणूनच मंडप, सभागृह, लॉन, कार्यालय यांच्या एकूण आसनक्षमतेच्या अर्ध्या आसनक्षमतेला परवानगी देण्यात यावी. किमान अशा कार्यक्रमांसाठी ५०० जणांच्या उपस्थितीबात तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. या वेळी असोसिएशनचे प्रवर्तक विनोद दर्यानी, उपाध्यक्ष दाऊद काद्री, सचिव सुनील महाले, खजिनदार जितेंद्र शर्मा व मंगेश ढगे, गणेश मटाले, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide financial assistance to hospitality business owners nashik marathi news