नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या; माजी आमदारांचे महसूलमंत्र्यांना साकडे

रोशन खैरनार
Monday, 26 October 2020

या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडीवरही अवकाळी पावसाचा विपरित परिणाम झाला आहे.

नाशिक : (सटाणा) बागलाण तालुक्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हजारो हेक्टरवरील पिकांसह कोट्यवधी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नुकतीच भेट घेतली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना साकडे 

सौ.चव्हाण यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री श्री.थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील नुकसानीचा आढावा मांडला. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यात सर्वत्र थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या तारांचा धक्का लागून शहरातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जनावरेही दगावली आहेत. विक्रीसाठी चाळीतून बाहेर काढून ठेवलेला हजारो क्विंटल उन्हाळ कांदा आणि मका या बेमोसमी पावसात पूर्ण भिजला तर नुकतेच टाकलेले उन्हाळी कांद्याचे महागडे उळे सडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, हिरवी मिरची, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज, काकडीवरही अवकाळी पावसाचा विपरित परिणाम झाला आहे. 

हेही वाचा >  पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

शेतकर्‍यांना अधिकाधिक आर्थिक मदत 

वादळी पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याने संसारही उघड्यावर पडले आहेत. महसूल विभागातर्फे तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी शेतकर्‍यांना तातडीच्या भरीव मदतीची खरी गरज असल्याने लवकरात लवकर शेतकर्‍यांना अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणीही सौ.चव्हाण यांनी यावेळी केली. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, सुनील खैरनार, नगरसेविका सुरेखा बच्छाव आदी उपस्थित होते. दरम्यान, महसूलमंत्री थोरात यांनी याप्रश्नी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide immediate financial assistance to the victims nashik marathi news