अखेर ठरलं...नाशिकमधील 'या' भागात जनता कर्फ्यू..सर्वपक्षीय नेत्यांकडून आवाहन

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 23 June 2020

नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे आठवडाभर बंद पाळण्याचा निर्णय झाल्यानंतर आता व्यावसायिकांच्या इतर संघटना पुढे येत असून विविध परिसरात बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. विविध व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढील चार ते पाच दिवसांचा बंद जाहीर केला आहे.

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे आठवडाभर बंद पाळण्याचा निर्णय झाल्यानंतर आता व्यावसायिकांच्या इतर संघटना पुढे येत असून विविध परिसरात बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. विविध व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढील चार ते पाच दिवसांचा बंद जाहीर केला आहे.

या भागात जनता कर्फ्यू

नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठा असलेल्या मेन रोड, शालिमार येथे आठवडाभर बंद पाळण्याचा निर्णय झाल्यानंतर आता व्यावसायिकांच्या इतर संघटना पुढे येत असून विविध परिसरात बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. पंचवटी, आडगाव, उपनगर, सिडको, इंदिरानगरच्या व्यावसायिकांच्या संघटनांनी पुढील चार ते पाच दिवसांचा बंद जाहीर केला आहे.

पंचवटीत आठवडाभर "जनता कर्फ्यू' 
पंचवटी शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंचवटीतील रुग्णांची संख्या अधिक असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे "आपण पंचवटीकर'तर्फे मंगळवार (ता. 23)पासून ते पुढील मंगळवार (ता.30)पर्यंत आठ दिवस "जनता कर्फ्यू' जाहीर करण्यात आला आहे. 
पंचवटी परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पंचवटीतील विविध पक्ष व संघटनांची बैठक दोन दिवसांपूर्वीच लक्ष्मी लॉन्सवर झाली. या बैठकीत संभाव्य बंदबाबत विचारविनिमय होऊन जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात बाजार समितीतील संभाव्य गर्दीसह इतर विषयांचा समावेश होता. 

बाजार समिती सुरूच राहणार 
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा माल नाशवंत असतो. याशिवाय अधीच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीसह खते, बी-बियाण्यांची दुकाने सुरूच राहणार आहेत. याशिवाय दवाखाने, औषधांची दुकानेही सुरूच राहतील. पंचवटीतील बंदबाबत शासनाकडून कोणताही सूचना नसल्याने बाजार समितीचे कामकाज सुरूच राहील, असे सचिव अरुण काळे यांनी सांगितले. 

सिडको, इंदिरानगर पाच दिवस बंद 
सिडको : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिडको व इंदिरानगर परिसरातील किराणा दुकांनासह अत्यावश्‍यक व्यवसाय बुधवार (ता. 24)पासून ते रविवार (ता. 28) पर्यंत बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार सीमा हिरे, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले, डी. जी. सूर्यवंशी, श्‍यामकुमार साबळे, दिलीप दातीर, तानाजी जायभावे, जगन पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब गिते, शिवाजी बरके, राकेश ढोमसे, गोविंद घुगे, दिलीप देवांग, रवी पाटील, सुमन सोनवणे, नाना सोमवंशी, विजय पाटील, किराणा व्यापारी संघटनेचे नंदकिशोर राठी, बाजीराव पाटील, भास्कर पवार, सराफ असोसिएशनचे दिलीप चव्हाण, सुमंत अहिरराव, रमेश वडनेरे, धान्य व्यापारी संघटनेचे नाना जाधव, नाशिक क्‍लॉथ मर्चंट असोसिएशनचे नरेश पारख, संपत काबरा, सौरभ महाजन, स्टेशनरी व्यापारी असोसिएशनचे अशोक सांगळे, राजेश लोढा आदी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन योगेश गांगुर्डे, भूषण राणे यांनी केले. 

उपनगर परिसरातही रविवारपर्यंत जनता कर्फ्यू 
नाशिक रोड ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मंगळवार (ता. 23)पासून रविवार (ता. 28)पर्यंत उपनगर, रामदासस्वामीनगर व गांधीनगर परिसरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद राहणार आहे. सर्व नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन व्यावसायिक आणि नगरसेवकांनी केले आहे. किराणासह भाजीपाला व फळ दुकानेही बंद राहणार आहेत. फक्त दूध व मेडिकल दिवसातून दोन तास सुरू राहणार आहेत. व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार नगरसेविका सुषमा पगारे, नगरसेविका आशा तडवी, नगरसेवक अनिल ताजनपुरे, नगरसेवक राहुल दिवे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजनेबाबत चर्चा केली. या वेळी सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

आडगाव आजपासून सहा दिवस बंद 
पंचवटी आडगाव परिसरातील प्रभाग दोनसह काही गावांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या मागणीवरून मंगळवार (ता. 23)पासून रविवार (ता. 28)पर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ व व्यावसायिकांनी घेतला आहे. बंदमधून रुग्णालये, मेडिकल व दूध व्यावसायिकांना वगळले आहे. व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून कोरोना आटोक्‍यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन नगरसेविका शीतल माळोदे यांनी केले आहे. 

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

अडीच हजारांचा दंड 
सिडकोतील बंददरम्यान मेडिकल व दूध व्यवसाय सुरू राहणार आहे. दुकान बंद न ठेवणाऱ्यांकडून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

पंचवटी परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येथील व्यावसायिक व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आठ दिवसांच्या "जनता कर्फ्यू'ची हाक दिली आहे. - ऍड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public curfew in Nashik city marathi news