शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! १ नोव्हेंबरपासून शासकीय दराने मका खरेदी; ऑनलाइन नावनोंदणीचे आवाहन

maize sale.jpeg
maize sale.jpeg

नाशिक : (येवला) गेल्या वर्षापासून कोरोनाचा बळी ठरलेल्या मका पिकाची साडेसाती अद्यापही संपली नाही. सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात मक्याला शासकीय हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, आनंदाची बाब म्हणजे ज्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे ती हमीभावाने (१,८५० रुपये) खरेदी जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आठ केंद्रांवर सुरू होणार आहे.

अल्प भावातही मक्‍याची विक्री 

जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून बदलत असून, बाजरी, डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटून मकासह कांदा व भाजीपाल्याने जागा घेतली आहे. सर्वाधिक क्षेत्र मक्यासाठी गुंतवले जात असून, शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात हे पीक निघत असल्याने उत्तम पर्याय मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा तब्बल सर्वाधिक दोन लाख ३७ हजार हेक्‍टरवर मका पीक आहे. मकाला सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात एक हजार ते एक हजार २५०, तर सरासरी एक हजार १०० रुपये दर मिळत असून, चालू हंगामातील उत्पन्न देणारे मक्याचे पहिले पीक निघाल्याने शेतकरी आर्थिक अडचण भागविण्यासाठी या अल्प भावातही मक्‍याची विक्री करताना दिसतोय. 

शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करा

सध्या मोठ्या मक्याची सर्वत्र काढणी झाली असून, अनेक ठिकाणी पावसाचा फटकाही मक्याला बसला. बिट्या ओल्या होऊन कोंब फुटले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन यंदा जिल्ह्यात झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावाच्या खरेदीची आस आहे. यंदा हमीभावात वाढ करून एक हजार ८५० रुपये दराने खरेदीचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याने मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार आठ खरेदी केंद्रांना यंदा मका, ज्वारी बाजरी व रागी खरेदीचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार या केंद्रावर १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत खरेदी होईल. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे. 

या केंद्रांना मिळाली परवनागी 

जिल्ह्यातील सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, लासलगाव येथे तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांना, तर नांदगाव येथे शनेश्वर तालुका संघ, मालेगाव येथे शेतकरी सहकारी संघ, सटाणा येथे दक्षिण भाग विकास सोसायटी या आठ संस्थांना हे भरडधान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे. 

ज्वारीसाठी दोन हजार ६४०, बाजरीसाठी दोन हजार १५०, मकासाठी एक हजार ८५०, तर रागीसाठी तीन हजार २९५ रुपये हमीभाव असून, त्यानुसार खरेदी होईल. ऑनलाइन नोंदणीच्या सूचना लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील. - विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक 

खासगी बाजारात सध्या मक्याला अल्प भाव असल्याने हमीभावाने खरेदीची मागणी होती. त्यानुसार परवानगी मिळाली आहे. मका, बाजरी पिकांची सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन नोंद, ८ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता शेतकऱ्यांनी करावी. - बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, येवला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com