रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मेडिकलपुढे रांगा; कोरोना पॉझिटिव्हसाठी संजीवनी मिळविण्यासाठी नातेवाइकांची पायपीट 

Remdesivir.jpg
Remdesivir.jpg

नाशिक / सिडको : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्शनचा शोध घेण्यासाठी शहरातील मेडिकल व फार्मसीच्या दारोदारी भटकण्याची वेळ आल्याचे चित्र बघायला मिळाले. 

रेमडेसिव्हिर इंजक्शनसाठी मेडिकलपुढे रांगा
नाशिक शहरासह सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तेथील डॉक्टर रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रिस्क्रिप्शन नोटवर लिहून देत आहेत. शहरात ज्या ठिकाणी उपलब्ध असेल तेथून ते आणून डॉक्टरांना द्यावे लागते. गरजेप्रमाणे रुग्णांना इंजेक्शन देण्यात येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. असाच काहीसा अनुभव रुग्णांच्या नातेवाइकांना दोन दिवसांपासून येतो आहे. जेथे इंजेक्शन उपलब्ध होते त्या ठिकाणी सकाळपासून नागरिकांना सदर फार्मसीला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नोट, कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट, आधारकार्डची झेरॉक्स सक्तीची करण्यात आली आहे. 

ग्रामीण रुग्णांच्या नातेवाइकांची शहरात पायपीट 
रुग्णांविषयीची माहिती घेतल्यानंतर रुग्णांना टोकन दिले जाते. जसजसे इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल तसतसे इंजेक्शन देण्यात येते. या प्रमाणात शनिवारी त्याची काही ठिकाणी विक्री करण्यात आली. अशीच काहीशी आपबीती चांदवड येथील एका रुग्णाच्या नातेवाइकावर आली. गोविंदनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याने संपूर्ण शहर पालथे घातले; पण त्याला इंजेक्शन मिळाले नाही. त्यामुळे तो हताश झाला. उमेद संपल्यानंतर सरतेशेवटी अंबड येथील एका मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध झाले. इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता त्यांनी एक नव्हे तर चार इंजेक्शन एकदम घेऊन ठेवले. जेणेकरून उद्या परत आपल्यावर अशी परिस्थिती यायला नको. आपल्या रुग्णाला कामात नाही आले तर ते दुसऱ्याला तरी देता येईल, या उद्देशाने इंजेक्शन खरेदी होत असल्याने तुटवडा आहे. 

रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड थांबेल. -पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक, चांदवड  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com