रेल्वेचे अत्याधुनिक 'डब्ल्यूएजी-१२' इंजिन भुसावळ विभागात दाखल

चेतन चौधरी
Wednesday, 5 August 2020

३-फेज तंत्रज्ञानावर आधारित या इंजीनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जेथे गाडी चालविण्याकरिता विजेचा वापर होतो, तसे गाडी थांबविण्यासाठी ब्रेक लावल्यानंतर वीजनिर्मिती होऊन पुन्हा मुख्य वाहिनीला पुरवठा केला जातो. यामुळे विजेची सुमारे १४ टक्के बचत होते.

नाशिक : (भुसावळ) भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वांत शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्रमांक ६००३५) भुसावळ विभागात मंगळवारी (ता. ४) दाखल झाले. भारतीय रेल्वेच्या मधेपुरा प्लांटमध्ये मेसर्स अलस्‍टॉम यांनी हे इंजिन तयार केले आहे. रेल्वे मालगाड्या अधिक वेगाने चालवून मालवाहतुकीच्या कामात सुधारणा करणे हा या इंजिनाचा मुख्य उद्देश आहे. 

इंजिनाची विभागीय व्यवस्थापकांकडून पाहणी 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी या इंजिनाची पाहणी केली. वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरओ) पी. के. भंज, सहाय्यक विभागीय अभियंता (टीआरओ) सुदीप रावत व अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. अत्याधुनिक ३- फेज तंत्राने बनविलेले हे इंजीन भारतीय रेल्वेत उपलब्ध इंजिनांपैकी सर्वाधिक शक्तिशाली असून, त्याची क्षमता १२ हजार हॉर्सपॉवर आहे. सामान्य इंजिनापेक्षा ही क्षमता दुप्पट आहे. 

दोन इंजिनांना भारी 

या इंजीनमुळे मालवाहतूक करणाऱ्या विशेषत: भुसावळ विभागातून धावणाऱ्या कोळसावाहू मालगाड्यांच्या वेगात लक्षणीय सुधारणा होईल. कोळशाने भरलेल्या गाड्या चालविण्यासाठी साधारणत: दोन इंजिने आवश्यक असतात. आता केवळ डब्ल्यूएजी-१२ हे एकच इंजीन अशा गाड्या सहज ओढून नेईल. 

इंजीन कॅबमध्ये रेकॉर्डिंग 

इंजीन शक्तिशाली आहे, तसे इंजीनचालकासाठी आरामदायक वातानुकूलित व्यवस्थेसह इंजीन कॅबमध्ये होणारे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉइस रेकॉर्डिंग सिस्टिम स्थापित केली गेली आहे. 

हेहा वाचा > आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

ब्रेकमधून वीजनिर्मिती 

३-फेज तंत्रज्ञानावर आधारित या इंजीनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जेथे गाडी चालविण्याकरिता विजेचा वापर होतो, तसे गाडी थांबविण्यासाठी ब्रेक लावल्यानंतर वीजनिर्मिती होऊन पुन्हा मुख्य वाहिनीला पुरवठा केला जातो. यामुळे विजेची सुमारे १४ टक्के बचत होते. आयजीबीटी आधारित तीन फेज तंत्रज्ञानामुळे या इंजीनसाठी विशेष देखभाल आवश्यक नाही. यामुळे हे जीजिन एकापेक्षा जास्त रेल्वेलाइनवर वापरले जाऊ शकते. 

शंभर लोकोपायलटना प्रशिक्षण 

नवीन इंजिनांच्या वापरामुळे देशातील रेल्वे मालगाड्यांच्या कामकाजात गुणात्मक सुधार होईल, अशी अपेक्षा आहे. भुसावळ विभागात हे इंजीन योग्य पद्धतीने ऑपरेट करता यावे यासाठी आठवडाभरात जवळपास १०० लोकोपायलटना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railways' state-of-the-art 'WAG-12' Entered the engine bhusawal section nashik marathi news