बॉटॅनिकल गार्डनची दुरवस्था थेट ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना सूचना

विक्रांत मते
Saturday, 17 October 2020

प्रकल्पाच्या वाताहातीची खबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचल्यानंतर तातडीने दखल घेत कार्यकर्त्यांना महापालिकेला जागे करण्याच्या सूचना दिल्या. ठाकरे यांच्या सूचनेचे पालन करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात धडक दिली.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारलेल्या बॉटॅनिकल गार्डनची दुरवस्था व टवाळखोरांच्या उच्छादाची खबर या ड्रीम प्रोजेक्टचे कर्तेधर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानावर पोचली. संतापलेल्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यानंतर शुक्रवारी (ता. १६) मनसैनिकांचा फौजफाटा थेट आयुक्तांच्या दालनात पोचला. दुरवस्था झालेल्या प्रकल्पाची दुरुस्ती करताना सुरक्षारक्षक नियुक्त करा; अन्यथा मनसेस्टाइल आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 

दुर्लक्षामुळे प्रकल्पाची वाताहात

महापालिकेत मनसेची सत्ता असताना सामाजिक दायित्वाच्या निधीतून (सीएसआर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे प्रकल्प शहरात आणले. त्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पंडित नेहरू वनोद्यानातील बॉटॅनिकल गार्डन प्रकल्प ओळखला जातो. टाटा कंपनीने प्रकल्पासाठी सुमारे वीस कोटींचा निधी दिला. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या हस्ते २०१६ मध्ये या प्रकल्पाचे दिमाखात उद्‍घाटन झाले. मनसेची सत्ता गेल्यानंतर मात्र महापालिकेने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याने वाताहात झाली. प्रकल्पाच्या वाताहातीची खबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोचल्यानंतर तातडीने दखल घेत कार्यकर्त्यांना महापालिकेला जागे करण्याच्या सूचना दिल्या. ठाकरे यांच्या सूचनेचे पालन करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात धडक दिली. दुर्लक्षामुळे प्रकल्पाची वाताहात झाली असून, लेझर शो बंद पडला आहे.

कोणाचा कोणाला पायपोस नाही

तुटलेल्या खेळणीमुळे मुले तेथे जात नाहीत. प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, मोकळ्या जागेत समाजकंटकांकडून मादक पदार्थांचे सेवन, महिलांची छेडछाड आदी प्रकार होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. टवाळखोरांकडून सुरक्षारक्षकांनाही दमदाटी केली जात असल्याने कोणाचा कोणाला पायपोस नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मनसेच्या काळात झालेल्या प्रकल्पांची दुरवस्था थांबविण्यासाठी हे शेवटचे निवेदन असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दातीर यांनी दिला. ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम शेख, गटनेत्या, नगरसेविका नंदिनी बोडके, प्रभाग समिती सभापती वैशाली भोसले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

महापालिकेला कुठलीही आर्थिक तोशिस न लागता मोफत मिळालेल्या प्रकल्पांची वाताहात होणे दुर्दैवी आहे. बॉटॅनिकल गार्डनची दुरवस्था थांबवून सुरक्षारक्षक न नेमल्यास मनसेस्टाइल आंदोलनाला सामोरे जावे लागेल. - दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष, मनसे  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray gave these instructions to the activist nashik marathi news