तो एक गिरीदुर्गच! लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेत अप्रकाशित ‘रामगड’ किल्ल्याचा शोध

राजेंद्र बच्छाव
Friday, 1 January 2021

 रामगडावर सद्यःस्थितीत कुठलेही हिंदू देवता, मंदिर, समाधी नाही. तरीही गडाचे नाव मात्र रामगड आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून माहिती घेतली असता या गडाचे नाव पूर्वीपासूनचे ‘रामगड’ आहे असे कळाले. 

इंदिरानगर (नाशिक) : नाशिकमधील गिर्यारोहक, वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेचे सचिव सुदर्शन कुलथे यांनी धुळे जिल्ह्यातील लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेतील अप्रकाशित ‘रामगड’ किल्ल्याचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. धुळे तालुक्यातील सडगाव येथे असणारा रामगड केवळ धार्मिक डोंगर नसून तो एक गिरीदुर्ग असल्याचे त्यांनी सांगितले. 

वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांकडून शोध घेतल्याचा दावा 
कुलथे म्हणाले, की काही वर्षांपूर्वी लळिंग किल्ल्याच्या भटकंतीदरम्यान याच पर्वतरांगेत एक धार्मिक डोंगर असून, त्यावर पाणी आहे, अशी जुजबी माहिती स्थानिक माणसांकडून मिळाली होती. त्यानंतर नकाशे, प्रत्यक्ष भेट आणि अधिक अभ्यास करून या डोंगराचे नाव रामगड आहे. रामगडाचे भौगोलिक स्थान २०.७९५८५० एन, ७४.६४७१५५ ई असे आहे. धुळे शहराला लागून असलेल्या लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ किलोमीटर अंतरावर असलेले सडगाव किंवा हेंकळवाडी ही रामगड किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण-दहिदी-अंजनाळे-सडगाव असाही मार्ग आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेत अप्रकाशित ‘रामगड’ 

किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १९६० फूट (५९७ मीटर) असून, किल्ला चढाईला सोप्या श्रेणीतला असून, अगदी अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो. रामगडाच्या खालच्या टप्प्यावर, तसेच गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पिराचे स्थान आहे. रामगडावर तीन खडक, खोदीव पाण्याची टाकी आहेत. पैकी दक्षिणेकडे १६ फूट लांब आणि १६ फूट रुंद असे भले मोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. उत्तरेकडे दुसरे पाण्याचे खोदीव टाके आहे. हे २४ फूट लांब, तर ८.५ फूट रुंद आहे. हे सुमारे सात फूट खोल असून, त्यातील पाणी पिण्याजोगे आहे. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

तिन्ही टाक्यांच्या काठावर गोलाकार कोरीव खड्डे
गडमाथ्यावरील पश्चिम दिशेला पाण्याचे तिसरे खोदीव टाके आहे. परंतु हे टाके सहजपणे दृष्टीस येत नाही. हे टाके अतिशय तीव्र उतारावर खोदलेले असून, टाक्यापर्यंत पोचण्यासाठी आणि टाक्यातील पाणी काढण्यासाठी सावधानतेने हालचाली कराव्या लागतात. हे टाके १६ फूट लांब, ८.५ फूट रुंद, तर सुमारे सहा ते सात फूट खोल असून, पाणी पिण्याजोगे आहे. या तिन्ही टाक्यांच्या काठावर गोलाकार कोरीव खड्डे दिसून येतात.

 पश्चिम टोकावरचा रामगड
उत्तरेकडे गडमाथ्याच्या सर्वोच्च बिंदूवर दगड रचलेले प्रमुख जोते आढळते. या जोत्यात एका पीरबाबाचे स्थान आहे. रामगडावर असणारी प्राचीन पाण्याची खोदीव टाकी, माथ्यावरील जोतीवरून हा एक किल्ला आहे असे दिसून येते. लळिंग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम पसरलेली आहे. लळिंग रांगेच्या पूर्व टोकावर लळिंग किल्ला आहे. पश्चिम टोकावर रामगड आहे. रामगडाचे स्थान लक्षात घेतले तर तो बरोबर लळिंग किल्ला आणि गाळणा किल्ला यांच्या मध्यभागी आहे. रामगडापासून सरळ रेषेत अंतर मोजले तर लळिंग दहा किलोमीटर, तर गाळणा १२ किलोमीटर अंतरावर आहे. रामगडाच्या माथ्यावरून कुठल्याही अडथळ्याविना लळिंग आणि गाळणा दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे हे या दोन्ही किल्ल्यांमध्ये लक्ष ठेवण्यासाठीचे चौकीचे ठिकाण असावे. 

तरीही गडाचे नाव मात्र रामगड

रामगडावरून दोन्ही किल्ल्यांवरील संदेश देणे/पोचविण्याचे कामही होत असावे असा कयास आहे. रामगडावरील पाण्याची साठवणूक आणि गडमाथ्याचा परीघ याचा अंदाज घेतला तर अगदी जुजबी शिबंदी येथे असावी. तीही फक्त पहारा देणे, चौकी म्हणून वापर करणे यासाठी होती. पीरबाबाचे ठिकाण अंदाजे किती जुने आहे आणि पिराचे नेमके नाव काय आहे, याविषयी माहिती मिळू शकली नाही. रामगडावर सद्यःस्थितीत कुठलेही हिंदू देवता, मंदिर, समाधी नाही. तरीही गडाचे नाव मात्र रामगड आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतून माहिती घेतली असता या गडाचे नाव पूर्वीपासूनचे ‘रामगड’ आहे असे कळाले. 

होळकरांच्या कागदपत्रांत उल्लेख? 
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ली दर गुरुवारी लोक येथे दर्शनासाठी येतात. नाशिकमधील प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि गिर्यारोहक गिरीश टकले यांचे या शोधमोहिमेसाठी मार्गदर्शन लाभले. यांनीही हा गिरीदुर्ग असण्याला दुजोरा दिला. त्यांच्या मतानुसार फारुखी सुल्तानांनी लळिंग किल्ला वसवला. त्या काळात टेहळणीच्या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. ब्रिटिश काळातील बंडाच्या वेळी होळकरांच्या कागदपत्रांत याचा उल्लेख सापडण्याची शक्यता आहे. कुलथे यांच्यासोबत राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, अविनाश जोशी, मनोज बैरागी यांनी दुर्ग शोधमोहिमेत भाग घेतला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramgad fort found in hills of Laling Fort nashik marathi news