'जळगावला रॅपिड किट देण्यासाठी कोणाचा दबाव?' शिवसेनेचा सत्ताधारी भाजपला सवाल

विक्रांत मते
Thursday, 10 September 2020

बिटको रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद पडले असताना सत्ताधारी भाजपवाले झोपले होते का? असा सवाल करताना कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण होण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला.

नाशिक : शहरातत रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटचा तुटवडा भासत असताना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे किटची मागणी केली. परंतु जळगाव महापालिकेसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या अठरा हजार किटसाठी माजी पालकमंत्र्यांचा दबाव होता का, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी करून किटच्या तुटवड्याला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

अठरा हजार रॅपिड टेस्ट किटचा मुद्दा

आमदार फरांदे यांच्याकडून वारंवार शासनाकडे बोट दाखवून रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटची मागणी केली जात आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार फरांदे यांनी किटची मागणी केली. शिवसेनेने जळगाव महापालिकेला दिलेल्या अठरा हजार रॅपिड टेस्ट किटचा मुद्दा उपस्थित केला. जळगावसाठी अठरा हजार किट कोणाच्या परवानगीने दिल्या, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दबाव होता का, असा सवाल केला. 

सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप

मुंबई, पुणेसह नाशिकपेक्षा कमी बजेट असलेल्या कल्याण, भिवंडी महापालिकांनी अंदाजपत्रकाच्या वीस टक्के रक्कम कोरोनासाठी राखीव ठेवली आहे. परंतु नाशिक महापालिका दहा टक्केदेखील खर्च करू शकत नाही. सत्ताधारी भाजपला ठेक्यामध्ये रस आहे. त्यासाठी ते चारदा बैठका घेतील, परंतु कोरोनासाठी विशेष बैठक घ्यायला वेळ नाही. बिटको रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद पडले असताना सत्ताधारी भाजपवाले झोपले होते का? असा सवाल करताना कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण होण्यास सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

आयुक्तांनी मैदानात उतरावे 

महापालिकेचे नवीन आयुक्त कैलास जाधव यांना कामकाज समजून घेण्यासाठी बराचसा वेळ दिला आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने त्यांनी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. कोरोना लढाईत सत्ताधारी भाजपबरोबर नसले तरी सक्षम विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. त्यामुळे बंद खोल्यांमध्ये बसून मागणी करणे वा टीका करणाऱ्या भाजपकडून अपेक्षा नको, अशी टीकाही बोरस्ते यांनी केली.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid Kit to Jalgaon Whose pressure to give, Shiv Sena's question to the ruling BJP nashik marathi news