जिल्हा रुग्णालयासह पाच रुग्णालयात 'रेमेडिसीव्हर'ची सोय; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विनोद बेदरकर
Friday, 25 September 2020

कोरोना रुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर रेमडीसीविर हे औषध वापरले जाते. या औषधांचा पुरवठा सर्वसामान्यांना वेळेत व्हावा या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फार्मसी कक्षात ५० टक्के साठा असेल..

नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडीसीविर या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे औषध आता जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील पाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. 

 येथे मिळेल औषध

कोरोना रुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर रेमडीसीविर हे औषध वापरले जाते. या औषधांचा पुरवठा सर्वसामान्यांना वेळेत व्हावा या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फार्मसी कक्षात ५० टक्के साठा तर उर्वरित साठ्यापैकी मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बिटको रुग्णालयात तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वसामान्यांना सोयीचे असेल अशा दोन खाजगी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. याबाबत घटना व्यवस्थापक यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येतील. अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात

रेमडिसिवीर वाटपाबाबत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे संपूर्ण अधिकार श्रीमती पवार यांना देण्यात आले असून घटना व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना नियमांचे पालन करुन औषधांच्या विक्रीची खात्री करणे, उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणच्या दर्शनी भागात माहीती प्रदर्शित करण्यासह सर्व गरजू रुग्णांना वेळेवर रेमडीसीविर उपलब्ध होत असल्याची खात्री करून रोज आपत्ती केंद्राकडे अहवाल देण्याची जबाबदारी त्यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

 
आजपासून जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या साठ्यापैकी ५० टक्के साठा जिल्हा रुग्णालयात तर उर्वरित पन्नास टक्केपैकी २५ टक्के डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय आणि २५ टक्के महापालिकेच्या बिटको रुग्णालयाला दिला जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाने त्यांच्याकडील साठयापैकी भौगोलिक रचना व गरजेनुसार दोन खासगी रुग्णालयांना वाटपासाठी ठेवावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक)  
 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remdesivir will be available at five hospitals nashik marathi news