ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजणार बिगुल; गावपुढाऱ्यांमध्ये संचारले नवचैतन्य

संतोष विंचू
Saturday, 19 September 2020

अशा ठिकाणचा अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत पाठवावा, असे सुचविले आहे. त्यानंतर निवडणुकीबाबत आयोग निर्णय घेणार आहे. सध्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेला असून, गावपुढारी मात्र केव्हा निवडणूक होईल आणि केव्हा आम्ही सत्तेत बसू याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

नाशिक : (येवला) कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम अर्ध्यावर थांबविण्यात आला आहे. आता सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर या ठिकाणी पुन्हा निवडणुकीचा फड रंगण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून या ठिकाणच्या सद्यःस्थितीतील परिस्थितीचा अहवाल मागितला असून, कोरोना नसल्यास निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. 

१०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक आयोगाने मागितला अहवाल 

एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील कळवणमधील २९, येवल्यातील २५, दिंडोरीतील ४४, इगतपुरीतील चार अशा १०२ ग्रामपंचायतींचाही समावेश होता. या ठिकाणी ३१ मार्चला मतदान आणि १ एप्रिलला मतमोजणी होणार होती. मात्र ६ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज छाननीच्या टप्प्यावर असताना कोरोनाची धकधक वाढत गेल्याने १७ मार्चला निवडणूक आयोगाने पत्र काढून येथील निवडणुकीला स्थगिती दिली. 

सत्तेत बसण्याची आतुरतेने वाट

सहा महिन्यांनंतर आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील मतदान स्थगित केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे तेथे मतदान घेणे शक्य आहे अशा ठिकाणचा अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत पाठवावा, असे सुचविले आहे. त्यानंतर निवडणुकीबाबत आयोग निर्णय घेणार आहे. सध्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेला असून, गावपुढारी मात्र केव्हा निवडणूक होईल आणि केव्हा आम्ही सत्तेत बसू याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

यांनाही लागले वेध..! 

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपैकी जुलैमध्ये ३७, ऑगस्टमध्ये ४५९, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबरमध्ये १०, नोव्हेंबरमध्ये एक व डिसेंबरमध्ये दहा अशा ५१९ ग्रामपंचायतींचीदेखील मुदत संपत आहे. त्यामुळे एप्रिल ते जूनदरम्यानच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या की पुन्हा जुलै ते डिसेंबरदरम्यानच्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यात कोरोनासोबत पुन्हा राजकीय वातावरण तापणार हे नक्की!

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report of 102 Gram Panchayats requested by Election Commission nashik marathi news