जेव्हा आशा कर्मचाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे; मानसिक त्रासाचा उद्रेक  

संजीव निकम
Friday, 9 October 2020

संपूर्ण आशा कर्मचारी यांनी सामुदायिक राजीनामे दिल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडून सुरू असलेले सर्वेक्षणाचे कामकाम ठप्प झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काय घडले नेमके?

नाशिक / नांदगाव : तालुक्यातील संपूर्ण आशा कर्मचारी यांनी सामुदायिक राजीनामे दिल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडून सुरू असलेले सर्वेक्षणाचे कामकाम ठप्प झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ काय निर्णय घेता, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काय घडले नेमके?

नांदगावला आशा कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे 

नांदगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या १५८ आशासेविका व गटप्रवर्तक बारा वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर ७४ विविध प्रकारची कामे करत आहेत. यातच कोरोना काळातही जिवाची पर्वा न करता या सर्व कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र एवढे काम करत असूनही आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आशासेविकांनी दिलेल्या अहवालावर केवळ स्वाक्षरी करत सर्व कामे आम्हीच केल्याचे दाखवत होते. यातच सर्व सेविकांना मोबाईल न देता ऑनलाइन कामे करण्यास सांगितले जात होते. अखेर विभागाचा मनमानी कारभार आणि अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला वैतागून १५८ आशा सेविकांनी सामुदायिक राजीनामे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सोनवणे यांच्याकडे सोपविले. 

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाचा उद्रेक 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि मानसिक त्रासाला कंटाळून तालुक्यातील सर्व आशा कर्मचारी व आठ गट प्रवर्तकांनी सामुदायिक राजीनामे दिले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे हे तिसरे आंदोलन आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कार्यवाहीबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. बुधवारी गटप्रवर्तकांनी राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी त्याचा उद्रेक झाला. तालुक्यातील सर्वच आशासेविकांनी पंचायत समितीबाहेर निर्दशने करत गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांना निवेदन दिले. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

कामकाजावर परिणाम 
सध्या नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आशासेविकांच्या सामूहिक राजीनामास्त्रामुळे ग्रामीण भागातील घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

सामुदायिक राजीनाम्याची पहिलीच वेळ 
एकीकडे तालुक्यातील कोरोचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील लक्तरे बाहेर पडू लागली आहेत. यापूर्वीदेखील आशा कर्मचाऱ्यांची याच कारणावरून आंदोलने झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कोरोनायोद्धा असलेल्या आशा कर्मचाऱ्यांना वेठीला धरले जात असल्याच्या निषेधार्थ थेट राजीनामे देण्याची ही पहिलीच घटना आहे. 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: resignations of Asha employees in Nandgaon nashik marathi news