नवरात्रोत्सवात गरबा, दांडियावर फुली; महापालिका आयुक्तांचे निर्देश

विक्रांत मते
Wednesday, 7 October 2020

गरबा-दांडियाऐवजी शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरे भरविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंडळांना दिले. 

नाशिक :  कोरोनामुळे मंदावलेले अर्थचक्र पूर्ववत करताना पुनश्‍च हरिओमचा नारा देण्यात आला असला तरी धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी मात्र कायम राहणार आहे. त्याचाच भाग म्हणून नवरात्रोत्सवात गरबा, दांडियावर बंदी घालण्यात आली असून, मंडप उभारतानाही परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. गरबा-दांडियाऐवजी शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरे भरविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंडळांना दिले. 

नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा

कोरोनामुळे यंदा गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पडले. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आयुक्त जाधव यांनी शासन आदेशानुसार निर्देश जारी केले. मंडप उभारण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडप उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच उभारता येणार आहे. नागरिकांनी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांना मूर्तीबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. घरगुती मूर्ती दोन तर, सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फुटापर्यंत मर्यादित ठेवली आहे. मूर्ती शक्यतो धातू, संगमरवराची असावी, पर्यावरणपूरक मूर्ती असल्याने घरच्या घरी विसर्जन करावे, जाहिरात प्रदर्शन करताना नागरिक आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी, जाहिराती आरोग्यविषयक व सामाजिक संदेशाच्या असाव्या, ध्वनिप्रदूषण होऊ नये, दर्शनाची सुविधा ऑनलाईन पद्धतीने करावी, मंडप आवारात निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंग करावे, भाविकांमध्ये शारीरिक अंतर ठेवावे, विसर्जन स्थळी जाणे टाळावे. विसर्जन मिरवणुकीवर बंदी मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नसावे, रावणदहनाचा कार्यक्रम नियम पाळून प्रतिकात्मक स्वरूपाचा असावा, आदी सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

मिरवणूक, वर्गणी, रावणदहनावर बंदी 

नवरात्रोत्सवात वर्गणी घेण्यास व गरबा-दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकांनाही मज्जाव करण्यात आला आहे. रावणदहनाचा कार्यक्रम ठराविक लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions on garba, dandiya during Navratri Nashik marathi news