
याआधीही याचप्रकारे प्रवासादरम्यान प्रवाशाकडील रोकड, दागिने चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले होते.
नाशिक : रिक्षात सहप्रवासी बनून इतर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा मध्यवर्ती गुन्हे शाखेने पर्दाफाश करीत टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांनी शहरात चार गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासास सुरवात
रुपेश कैलास भागवत (वय २६, खैरे गल्ली, भद्रकाली), मोईन मेहबूब शहा (२२, वडाळागाव), आरिफ सादिक शेख (३४, नानावली), नवशाद नजाकत खान (२०, समतानगर, टाकळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० डिसेंबरला एका प्रवाशास रिक्षातील इतर प्रवाशांनी लुटल्याची घटना घडली होती. याआधीही याचप्रकारे प्रवासादरम्यान प्रवाशाकडील रोकड, दागिने चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखेवर ही जबाबदारी सोपवत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासास सुरवात केली. संशयितांच्या रिक्षास क्रमांक दिसत नव्हता.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
चौघांविरुद्धात गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिस शिपाई विशाल वाघ व अनिल शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयितांची टोळी रिक्षातून पंचवटीकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे सापळा रचून रिक्षास अडवले. त्यातील चौघांनाही पकडून विचारपूस केली असता त्यांनी सरकारवाडा व मुंबई नाका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार चौघांनाही अटक करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक महेश शिंदे, कर्मचारी मिलिंद बागूल, सचिन आजबे, अतुल पाटील, युवराज कानमहाले, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप