चाकूचा धाक दाखवून सराफ व्यावसायिकाची लूट 

संतोष विंचू
Saturday, 3 October 2020

संतोष बाविस्कर दररोज याच मार्गावरून मनमाड ते विखरणी, असा प्रवास करतात. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून ही लूट केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

येवला (जि.नाशिक) : विखरणी (ता. येवला) येथील सराफ व्यावसायिक संतोष बाविस्कर यांना चोरट्यांनी विसापूर फाटा येथे चाकूचा धाक दाखवून लुटले. या वेळी चोरट्यांनी त्यांच्याकडील एक लाख ३० हजार रुपये किमतीचे ऐवज लुटून नेला. 

विसापूर फाटा येथील घटना 
बाविस्कर हे गुरुवारी (ता. १) सायंकाळी विखरणी येथील आपले दुकान बंद करून मनमाडकडे जात असताना विसापूर फाटा येथे पाठीमागून आलेल्या तिघांनी संतोष बाविस्कर यांच्याशी झटापट करत त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील किमती ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच मनमाड विभाग पोलिस अधीक्षक समीरसिंह साळवे व तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

चोरट्यांनी पाळत ठेवून लूट केल्याचा अंदाज

बाविस्कर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत पुढील तपास करत आहेत. संतोष बाविस्कर दररोज याच मार्गावरून मनमाड ते विखरणी, असा प्रवास करतात. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून ही लूट केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of a gold seller yeola nashik marathi news