पितृछत्र हरपलं..पण आईला सोनियाचा दिवस दाखविण्यासाठी लेकाची धडपड...एकदा वाचाच

दिपक देशमुख
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

तो चौथीच्या वर्गात शिकताना वडिलांचे निधन झाले. वडील विठोबा दराखा सुरत येथे कंपनीमध्ये काम करून कुटुंबाचे पालनपोषण करीत असताना वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. यामुळे पत्नी नंदाबाई यांना दोन्ही मुलांचे शिक्षण, संगोपन कसे करावे या विवंचनेने ग्रासले.

नाशिक / झोडगे : सैन्यदलात भरती होत देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रोहित दराखा याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ८९.२० टक्के मिळवून आईच्या चेहऱ्यावरील हास्य आणले. हाच प्रसंग रोहितने आनंदोत्सव म्हणून साजरा केला. 

कुटुंबाला आर्थिक हातभार 

टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या रोहित दराखाची हलाखीची परिस्थिती असून, तो चौथीच्या वर्गात शिकताना वडिलांचे निधन झाले. वडील विठोबा दराखा सुरत येथे कंपनीमध्ये काम करून कुटुंबाचे पालनपोषण करीत असताना वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. यामुळे पत्नी नंदाबाई यांना दोन्ही मुलांचे शिक्षण, संगोपन कसे करावे या विवंचनेने ग्रासले. मात्र आपल्या जीवनातील संकट बाजूला सारून मुलांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नंदादीप प्रज्वलित करण्याचा संकल्प सोडून मिळेल ते काम करून दोन्ही मुलांना मायेची ऊब देत शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या जीवनातील संकट व रोहितसह भावंडांची शिक्षणाची जिद्द, चिकाटी पाहता शिक्षण घेत असलेल्या शाळेतच पोषण आहार शिजविण्याचे काम नंदाबाई दराखा यांना मिळाले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला.

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

देशसेवा करण्याचे स्वप्न

आपल्या नजरेसमोर शिक्षण घेऊन मोठा होणारा रोहित अभ्यासासोबत आईला कटलरी व्यवसाय व शिवणकामात मदतीचा हात देताना दिसतो. दोन्ही भावंडांना आपल्या आईच्या जीवनातील नंदादीप प्रकाशमान करण्यासाठी कठीण परिस्थितीत ही उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करून शाळेसह गावाचे नाव रोशन करण्यासाठी कठीण परिश्रम करून यशस्वी होण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. रोहितच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शांताराम लाठर, सचिव अजित लाठर, मुख्याध्यापक सुनील फरस, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्मिता फरस, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit's success in a very unfavorable situation nashik marathi news