एकही सेंटर नसलेल्या धुळ्यात चक्क सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी..!

संतोष सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा 
Friday, 28 February 2020

"व्यथा डायलिसिसच्या रुग्णांची' या मालिकेद्वारे उत्तर महाराष्ट्रातील डायलिसिस सेंटर, प्रतीक्षायादीतील रुग्णसंख्या, किडनीरोगतज्ज्ञ व तंत्रज्ञांची कमतरता आदींबाबत वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून डायलिसिससाठी वेटिंगवर असलेल्या रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून "सकाळ'मध्ये ही मालिका सुरू होती. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धुळ्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकही डायलिसिस सेंटर नव्हते. त्यामुळे किडनी विकारांच्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालय किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागत होते.

नाशिक : "व्यथा डायलिसिसच्या रुग्णांची' ही मालिका "सकाळ'ने प्रसिद्ध करून उत्तर महाराष्ट्रातील डायलिसिस सेंटर व तोडक्‍या यंत्रांबाबत ऊहापोह करण्यात आला होता. मालिका प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाला खळबळून जाग आली. एकही सेंटर नसलेल्या धुळ्यात सहा डायलिसिस यंत्रांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय एक किडनीरोगतज्ज्ञ व तीन तंत्रज्ञांचीही तरतूद लवकरच होणार आहे. मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्याकडून डायलिसिस सेंटरसाठी आवश्‍यक साधनसामग्रींची माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार कार्यवाही होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने तालुकास्तरीय डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी "सकाळ'ला दिली. 

राजेश टोपे : टप्प्याटप्प्याने तालुकास्तरीय डायलिसिसची उभारणी 
"व्यथा डायलिसिसच्या रुग्णांची' या मालिकेद्वारे उत्तर महाराष्ट्रातील डायलिसिस सेंटर, प्रतीक्षायादीतील रुग्णसंख्या, किडनीरोगतज्ज्ञ व तंत्रज्ञांची कमतरता आदींबाबत वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून डायलिसिससाठी वेटिंगवर असलेल्या रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून "सकाळ'मध्ये ही मालिका सुरू होती. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धुळ्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकही डायलिसिस सेंटर नव्हते. त्यामुळे किडनी विकारांच्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालय किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. त्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांत डायलिसिसचे रुग्ण उपचारासाठी प्रतीक्षायादीत होते. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून उत्तर महाराष्ट्रातील प्रतीक्षायादीतील रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित रुग्णांना प्रतीक्षायादीत न ठेवता त्यांना तत्काळ डायलिसिसचे उपचार द्यावेत, असे आदेश विभागाकडून उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाकडूनही याबाबतचे पत्र ई-मेलद्वारे पाठविण्यात आले. 
 

टप्प्याटप्प्याने तालुकास्तरीय डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यात डायलिसिस सेंटर नव्हते. संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून, त्यानुसार तेथे डायलिसिस सेंटरला मंजुरी देण्यात आली. उत्तर महाराष्ट्रात कुठल्याही रुग्णांना जर डायलिसिसचा उपचार मिळत नसेल, तर त्यांनी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तशी तक्रार नोंदवावी, उपचारापासून कुणीही वंचित राहणार नाही. -राजेश टोपे, आरोग्यमंत्री 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या मालिकेची दखल घेऊन, नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर येथील प्रतीक्षायादीतील रुग्णसंख्या मागविण्यात आली आहे. तसेच डायलिसिस सेंटर, किडनीरोगतज्ज्ञ व तांत्रिक विभागातील कर्मचारी आदींची माहिती मागविण्यात आली. डायलिसिस सेंटरबाबतचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असल्याने आपण सर्व अहवाल मुंबई आरोग्य विभागाला देणार आहोत. -डॉ. रत्ना रावखंडे, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक 

मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांचा मंगळवारी दूरध्वनी आला होता. त्यानुसार डायलिसिस सेंटरबाबत आवश्‍यक साधनसामग्रीची चर्चा झाली. जिल्हा रुग्णालयासाठी सहा डायलिसिस मशिन, एक किडनीरोगतज्ज्ञ व तीन तंत्रज्ञ कर्मचारी आवश्‍यक असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच हाफकिन इन्स्टिट्यूटकडून यंत्रसामूग्री मिळणार आहे. -डॉ. माणिक सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक, धुळे 

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Impact News about Approval of six dialysis devices in Dhule Nashik Marathi News