
नाशिक : (अंबासन) गावातून शिक्षणाची गंगा वाहू लागली, की कुठल्याही क्षेत्रात भरारी घेत नावलौकिक करता येतो. उच्चपदावरील अधिकारी व शिक्षकांचे गाव म्हणून निताणे (ता. बागलाण) गावाची ओळख आहे. जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार आणि पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाच्या विविध योजना राबवून गावातील विकासाला गती मिळत असल्याने गाव आत्मनिर्भरतेच्या वाटेवर आहे.
ग्रामपंचायतीमार्फत विविध उपक्रम
निताणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीची स्थापना १९५७ मध्ये झाली. गावाची लोकसंख्या दोन हजार ७७१ इतकी असून, मुख्य व्यवसाय शेती आहे. दहा वर्षांपूर्वी गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांच्या प्रयत्नांतून करंजाडी नदीवर सिमेंट बंधारा बांधल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला, तसेच शेतीचे क्षेत्रही ओलिताखाली आले. यामुळे शेतीपिकांनाही जीवदान मिळाले. गेल्या तीन वर्षांत गावातील पात्र लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देऊन ग्रामपंचायतीमार्फत हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न केला.
पाच वर्षांत अनेक विकासकामे
जिल्हा परिषद सदस्य पगार व पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे केली. यात गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, जनसुविधांतर्गत स्मशानभूमी बैठकव्यवस्था, आदिवासी वसाहतीतील डांबरीकरण, दलित वस्तींतर्गत भूमिगत गटारी, रस्ता काँक्रिटीकरण, गावात ठिकठिकाणी पथदीप, हायमास्ट बसविण्यात आले आहेत, तसेच गावाला टंचाईसदृश परिस्थिती निर्माण असल्याने शासनाने २०१४-१५ मध्ये सोमपूर येथील मोसम नदीपात्रातून स्वतंत्र राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजूर असून, योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.
गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या प्रयत्नातून ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत आदिवासी वसाहतीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, काम लवकरच सुरू होणार आहे. गावातील प्राचीन राममंदिर सभामंडपासाठी माजी आमदार दीपिका चव्हाण व जिल्हा परिषदेचे सदस्य पगार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने मंदिराचे काम प्रगतिपथावर आहे. गावात स्वतंत्र आरोग्य केंद्र आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षणप्रेमी डॉ. प्रीतेश देवरे यांनी आरओ सिस्टिम बसविली आहे. मुरलीधर देवरे व विठ्ठल देवरे यांनी प्रदीर्घ काळ सोसायटीचे अध्यक्ष व सरपंच कारकीर्दीत गावातील विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय कामगिरी
लॉकडाउनच्या काळात गावात सॅनिटायझर वाटप, आरोग्यासाठी जनजागृती, सुरक्षिततेसाठी आठवडेबाजार आजतागायत बंद ठेवून गर्दी नियंत्रणात केली. गावात दवंडी, गृहभेटी देऊन आरोग्यसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी, लोकांनी गर्दी करू नये व कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये यासाठी ग्रामरक्षकांची स्थापना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच अरुणा पवार, माजी सरपंच सुरेखा देवरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.
गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सदस्य, तसेच सरपंच, सदस्य गावाच्या सहकार्याने गावात विकासकामे करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तसेच भविष्यातही विकासाचा प्रयत्न राहील. - राहुल निकम, ग्रामसेवक, निताणे
गावाच्या एकोप्याने सर्व काही शक्य आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत आहे. वेळोवेळी गावात फवारणी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती केली जात आहे. - वसंत पवार, पंचायत समिती सदस्य, बागलाण
जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार व पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार यांचे सहकार्य लाभल्याने गाव आत्मनिर्भरतेच्या वाटेवर आहे. कोरोनाबाबत संपूर्ण काळजी घेतली जात आहे. - नितीन देशमुख (प्रशासक), विस्तार अधिकारी, बागलाण
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.