
शहरातील मुस्लिम समाजातील महिलांनी डॉक्टर, वास्तुविशारद, शिक्षिका, वकील, अभियंता यासह विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करीत नावलौकिक मिळविला आहे. येथील मुस्लिम तरुणीने पायलट होत आकाशात उंच भरारीदेखील घेतली.
मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील मुस्लिम समाजातील महिलांनी डॉक्टर, वास्तुविशारद, शिक्षिका, वकील, अभियंता यासह विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करीत नावलौकिक मिळविला आहे. येथील मुस्लिम तरुणीने पायलट होत आकाशात उंच भरारीदेखील घेतली. शहरातील पूर्व भागातील पहिली रिक्षाचालक महिला होण्याचा मान शबिनाने मिळविला आहे. शबिना सहा वर्षांपासून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आहे.
रिक्षा चालवून शबिनाकडून मुलांचा उदरनिर्वाह
येथील मालधे भागात राहणारी शबिना वसीम अहमद ही महिला रिक्षा चालवून पोटाची खळगी भरते. शबिना यांचा पती सहा वर्षांपासून घर सोडून गेल्यानंतर कुटुंब चालवायला साधन नव्हते. शबिना यांना दोन मुले व मुलगी आहे. शबिना यांची तिन्ही मुले लहान असल्याने दुसरा विवाह न करण्याचा निर्णय केला. शहरात महिलांसाठी पुरेसे काम नाही. तरासन भरणे, काजे-बटण, पोळ्या लाटणे व अन्य कामात कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नसल्याने त्यांनी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला भाडेतत्त्वावर रिक्षा चालविली. त्यातून त्यांना दिवसाकाठी दोनशे रुपये मिळत होते. शबिना यांनी काही वर्षे विविध भागांतून रिक्षामधून फक्त महिलांची प्रवासी वाहतूक केली. मिळणाऱ्या पैशातूनच बचत करत कालांतराने त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली.
हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ
मालेगावच्या पूर्व भागात भरते पोटाची खळगी
सहा वर्षे त्या रिक्षाचालक म्हणून काम करीत आहेत. कुटुंबाचा कुठलाही आधार नसताना रिक्षा शिकून भाडेतत्त्वावर रिक्षा चालवत व नंतर स्वकष्टाने रिक्षा घेऊन त्यांनी समाजात वेगळा ठसा उमटविला आहे. स्वत: रिक्षा चालवत असलेल्या शबिना यांनी तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्याचा संकल्प सोडला आहे. शबिना सकाळी घरची सगळी कामे व स्वयंपाक करून दुपारी बाराला रिक्षा व मुलांना सोबत घेऊनच बाहेर पडते. रिक्षा चालविताना लहान मुलगा पोटाशी बांधलेला असतो. मोठा मुलगा पाठीमागे बसतो. दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत त्या रिक्षा चालवितात. भाडेतत्त्वावरील रिक्षा चालविण्यापेक्षा स्वत:ची रिक्षा असल्याने इंधन खर्च जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह व काही बचत होईल एवढा पैसा मिळत असल्याने त्या समाधानी आहेत.
हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच
महिला प्रवाशांना प्राधान्य
शबिनाचे सर्वत्र कौतुक होते. शहरातील अंजुमन चौक व गांधी मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात असतात. या बाजारात शहर व परिसरातील महिला व तरुणी खरेदीसाठी येतात. शबिना याच महिलांना रिक्षातून विविध ठिकाणी प्रवास घडवीत आहेत. परिवारासह महिला असल्यासच पुरुषांना त्यांच्या रिक्षात संधी असते. त्या स्वत: महिला असल्याने महिला आवर्जून शबिनाच्या रिक्षाला प्राधान्य देतात. विधवा, तलाक दिलेल्या महिलांसाठी शबिना यांचे काम प्रेरणादायी आहे.