हरिद्वारला एप्रिलमध्ये कुंभमेळा? नाशिकचे महंत पोचले पूर्वतयारीसाठी  

महेंद्र महाजन
Monday, 7 September 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हरिद्वारचा कुंभमेळा होणार की नाही? याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर गेल्या काही दिवसांपूर्वी डेहराडूनमध्ये सचिवालयात आखाडा परिषद आणि कुंभमेळा यंत्रणांच्या बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी पायाभूत सुविधांच्या पूर्णत्वासाठी डिसेंबरपर्यंतची ‘डेडलाइन’ दिली आहे.

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हरिद्वारचा कुंभमेळा होणार की नाही? याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर गेल्या काही दिवसांपूर्वी डेहराडूनमध्ये सचिवालयात आखाडा परिषद आणि कुंभमेळा यंत्रणांच्या बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी पायाभूत सुविधांच्या पूर्णत्वासाठी डिसेंबरपर्यंतची ‘डेडलाइन’ दिली आहे. श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री हे नाशिकहून आखाड्याच्या पूर्वतयारीसाठी हरिद्वारमध्ये पोचले आहेत. त्यांनी ही माहिती दिली. 

उत्तराखंड सरकारची डिसेंबरपर्यंत ‘डेडलाइन’ 
देशामध्ये हरिद्वारनंतर प्रयागराज (अलाहाबाद), उज्जैन, नाशिक-त्र्यंबकेश्‍वर या क्रमाने बारा वर्षांमधून एकदा कुंभमेळा होतो. दरम्यान, गंगाकिनारी ‘हर हर गंगेचा’ जयघोष होणार, हे उत्तराखंड सरकारच्या पूर्वतयारीवरून स्पष्ट झाले. या संदर्भात महंत शास्त्री यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, की हरिद्वारमध्ये दहा आखाडा स्थायी स्वरूपाने उभे आहेत. सद्यःस्थितीत पाऊस सुरू असून, कोरोना विषाणू संसर्गामुळे कामांसाठी मजुरांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या पूर्वतयारीचा वेग काहीसा मंद आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यास महाकुंभमेळा नेहमीप्रमाणे होईल. अथवा साथीचे प्रमाण काहीसे राहिल्यास शारीरिक अंतर ठेवत सुरक्षेची काळजी घेऊन शाहीस्नानाप्रमाणे मिरवणुका होतील. आखाड्यांच्या देवता शाहीस्नान करत असल्याने महाकुंभमेळ्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

जागावाटप फेब्रुवारी-मार्चमध्ये 
लक्ष्मीनारायण मंदिराचे श्री महंत रामसनईदास शास्त्री महाराज म्हणाले, की हरिद्वार कुंभमेळ्याची तयारी उत्तराखंड सरकारकडून सुरू आहे. सद्यःस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग फैलाव असल्याने आम्ही नाशिकमध्ये आहोत. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये आखाड्यांसाठी जागांचे वाटप होईल. त्यावेळी हरिद्वारला जाण्याची तयारी केली जाईल. 

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप
 
वैष्णव संप्रदायच्या तीन आखाड्यांचे शाहीस्नान 
- चैत्र सोमवती आमावस्या ः १२ एप्रिल २०२१ 
- मेष संक्रांत ः १४ एप्रिल २०२१ 
- चैत्र पौर्णिमा ः २७ एप्रिल २०२१  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahisnan at Haridwar in April nashik marathi news