
शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत फुटिरांविरुद्ध कारवाईचा सूर ध्वनित झाला. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले. पण त्याच वेळी आघाडी धर्माचा सवाल केला जाईल म्हणून राष्ट्रवादीचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, मीच आघाडी धर्म पाळायचा काय, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
नाशिक : सिन्नरमध्ये उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘पारनेर २’ राजकारण राज्यामध्ये ‘रिपीट’ झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हे प्रकरण वाजे-कोकाटे यांच्यातील परंपरागत राजकीय संघर्षाचा परिपाक आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचे हे प्रतिबिंब असून, बहुमतात उभी फूट पडल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढीस लागली आहे. शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत फुटिरांविरुद्ध कारवाईचा सूर ध्वनित झाला. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले. पण त्याच वेळी आघाडी धर्माचा सवाल केला जाईल म्हणून राष्ट्रवादीचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, मीच आघाडी धर्म पाळायचा काय, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
पारनेरचा नव्हे सिन्नरच्या घराणेशाहीचा पॅटर्न
जातीय समीकरणांनुसार उपनगराध्यक्षपद देण्याचा फॉर्म्युला शिवसेनेच्या गोटात तयार झाला होता. त्यानुसार उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा तीन महिन्यांपूर्वी दिला गेला. पण लॉकडाउनमध्ये पुढील प्रक्रिया झाली नाही आणि नाराजांना गळाला लावण्यात राष्ट्रवादी फत्ते झाली. मात्र ॲड. कोकाटे यांना हे मान्य नाही. आघाडी धर्माच्या नात्याने काय करायचे हे मला विचारायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले, की उलटपक्षी आम्ही आघाडी धर्माचे पालन केले. शिवसेनेच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद दिले. नगरसेवकांमध्ये फूट पडल्यावर आघाडी धर्माची आठवण झाली.
हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?
शिवसेना अस्वस्थ अन् राष्ट्रवादीचा आघाडी धर्माचा सवाल
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फुटीची बीजे रोवली गेली होती. त्यामध्ये शिवसेनेतील खदखदसुद्धा कारणीभूत ठरली आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी मतदानाच्या विभागणीवेळी झालेल्या फुटीकडे अंगुलीनिर्देश केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले, की शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीला चार नगरसेवक वगळता इतर उपस्थित होते. पक्षशिस्तीचा भंग केल्याची भावना उपस्थितांमध्ये होती. त्यामुळे संपर्कनेते संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांना बैठकीत झालेल्या चर्चेतील माहिती देण्यात आली आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागण्यात आली आहे. पक्षातर्फे देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार पक्षशिस्त मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू
पालकमंत्र्यांच्या भूमिकेला महत्त्व
पारनेरप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील शिवसेनेतील फूट गांभीर्याने घेतल्यास राष्ट्रवादीच्या गोटात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. त्यामुळे श्री. भुजबळ काय भूमिका घेणार, यावर सिन्नरमधील आगामी राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिन्नर पालिकेच्या निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ॲड. कोकाटे राजकीय बदलासाठी आग्रही राहणार असले, तरीही फुटून गेलेल्यांना श्री. वाजे यांची सोबत नसल्याचा तोटा होणार काय, याचे उत्तर आगामी निवडणुकीत मिळणार आहे.
रिपोर्ट - महेंद्र महाजन
संपादन - ज्योती देवरे