"बेसमेंटमध्ये व्यवसाय नको रे बाबा!"  मालेगावचे व्यावसायिक त्रस्त

प्रमोद सावंत
Thursday, 6 August 2020

शहरातील व्यापारी व निवासी संकुलांसह सुमारे दोनशेहून अधिक बेसमेंट जलमय झाले आहेत. बेसमेंटचा पाणीउपसा करण्यासाठी व्यावसायिकांचा वीजबिलाचा होणारा खर्च दैनंदिन नफ्यापेक्षा जास्त असल्याने या व्यावसायिकांवर बेसमेंटचा व्यवसाय नकोरे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.​

नाशिक / मालेगाव : मालेगाव शहर व परिसरावर यंदा वरुणराजा मेहरबान झाला आहे. ऑगस्टच्या प्रारंभीच मालेगाव तालुक्याची पावसाची सरासरी टक्केवारी ११७.३५ टक्के झाली आहे. सातत्यपूर्ण समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला असला, तरी शहरातील विविध व्यापारी संकुलांत बेसमेंटला व्यवसाय करणारे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. 

तळघरांना विहिरींचे स्वरूप
शहरातील व्यापारी व निवासी संकुलांसह सुमारे दोनशेहून अधिक बेसमेंट जलमय झाले आहेत. बेसमेंटचा पाणीउपसा करण्यासाठी व्यावसायिकांचा वीजबिलाचा होणारा खर्च दैनंदिन नफ्यापेक्षा जास्त असल्याने या व्यावसायिकांवर बेसमेंटचा व्यवसाय नकोरे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील जलमय परिस्थिती पाहता आगामी काळात शहरात निवासी व व्यापारी संकुलात बेसमेंट निकामी ठरणार आहे. शहरातील लोढा भुवन, स्टेट बँक चौक, कॅम्प रोड, संगमेश्‍वर या भागातील संकुलांत तळघरात कधीही पाणी शिरलेले नव्हते. यंदा मात्र या भागांसह शहरातील सर्व तळघरांना विहिरींचे स्वरूप आले आहे.

 
१८ ते २० हजार रुपये वीजबिल
शहरात नजर जाईल तिकडे बेसमेंटमधून विहिरीसारखे दोन ते तीन इंची पाइप टाकून पाण्याचा उपसा करून पाणी गटारीत सोडले जात असल्याचे दृश्‍य जागोजागी नजरेस पडत आहे. येथील रचना फोटो स्टुडिओचे संचालक राजेश जाधव म्हणाले, की महिन्यात व्यवसाय होतो २५ ते ३० हजारांचा. वीजबिल मात्र येते १८ ते २० हजार रुपये. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

पावसाने शंभरी ओलांडल्याने मालेगाव जलमय 
जूनच्या सुरवातीपासूनच बेसमेंट जलमय झाले आहे. सलग दीड महिना स्टुडिओ पाण्याखाली आहे. कॅम्प रस्त्यावरील असंख्य व्यापारी संकुलांची हीच स्थिती आहे. शहरातील प्रसिद्ध सुखसागर हॉटेलच्या तळघरातही या वेळी प्रथमच पाणी शिरले. सोयगाव-नववसाहत व कॅम्प भागातील सर्व व्यापारी संकुलांची तळघरे पाण्याने तुडुंब भरली असून, अनेक ठिकाणी पाण्याचा उपसा न झाल्याने पाण्यावर शेवाळाचा थर साचला आहे. बहुसंख्य व्यावसायिकांचे वीजबिलाने कंबरडे मोडले आहे. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

धरणांचा तालुका अद्याप कोरडाठाक 
मालेगाव तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४५७.६१ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टअखेर ३४२ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा ५ ऑगस्टअखेर ५३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील सरासरी पर्जन्यमान १०७ मिलिमीटर आहे. अद्याप २५ दिवस शिल्लक आहेत. ऑगस्टमध्येही पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. मालेगाव व बागलाणची परिस्थिती समाधानकारक असताना धरणांचा तालुका कळवण कोरडाठाक आहे. कळवण तालुक्यात ३०४ मिलिमीटर (४७.५३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. चणकापूर धरणात २६ टक्के, तर पुनंद धरणात ४६ टक्के साठा आहे. याउलट हरणबारी धरणात ८६ टक्के साठा झाला आहे. 

रिपोर्ट - प्रमोद सावंत

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shoppers Not interested in the basement business nashik malegaon marathi news