एसटी सेवेला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद बसस्‍थानकांत तुरळक गर्दी; सुरक्षित अंतरालाच प्राधान्‍य

bus responce.jpg
bus responce.jpg

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली असली, तरी पहिल्या दिवशी प्रवाशांकडून अल्‍प प्रतिसाद मिळाला. बसस्‍थानकांत तुरळक गर्दी असून, बसमध्येही सुरक्षित अंतर ठेवत प्रवासालाच प्राधान्‍य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. ठराविक मार्ग वगळता प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्‍याचे चित्र आहे. 

प्रवाशांचा प्रतिसाद ‍वाढण्याची शक्‍यता

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गेल्‍या २० ऑगस्टपासून एसटी महामंडळाने आंतरजिल्हा बससेवा सुरू केली. मात्र, निम्म्या प्रवासी क्षमतेने ही सेवा सुरू होती. प्रवाशांची गैरसोय टाळताना, उत्पन्नवाढीसाठी पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी प्रवाशांकडून मात्र अल्‍प प्रतिसाद मिळत आहे. त्‍यामुळे बहुतांश बसगाड्यांमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसून प्रवास करत असल्‍याचे चित्र बघायला मिळाले. गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील परिवहन महामंडळांनी यापूर्वीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आगामी काळात प्रवाशांचा प्रतिसाद ‍वाढण्याची शक्‍यता आहे. बसगाड्यांमध्ये प्रवाशांना मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करण्यासह विविध उपाययोजनांद्वारे प्रवास करता येईल. 

प्रवाशांनो, एसटीला वाचवा : रेडकर 

दरम्‍यान, गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून लालपरीचे चाक जागीच उभे होते. सध्या बससेवा पूर्वपदावर येत असताना प्रवाशांना महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्‍यातर्फे भावनिक आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावरील या आवाहनात महामंडळाचा आजवरचा प्रवास नमूद केला आहे. आपल्या ७२ वर्षांच्या अखंड प्रवासात अनेक चढ-उतार एसटीने पाहिले. कुठलाही मोर्चा निघाला, तरी एसटी अडवली जाते. आंदोलनात एसटीच पेटवली जाते. अपघाताचा दोष एसटीवरच असतो. एसटी धावल्‍याने गरिबांच्या लेकीबाळी माहेरी पोचल्या. गाव-वाड्यांवरील मुली शिक्षण घेऊ शकल्या. गावात पहिल्यांदा वृत्तपत्र एसटी पोचवत होती. लॉकडाउननंतर एसटीचे दैनंदिन प्रवासी उत्पन्न २२ कोटींवरून घटून आज अवघे तीन कोटींवर आले आहे. डिझेलचेही पैसे वसुल होत नसून, अशा बिकट आर्थिक परिस्थितीत नवसंजीवनी देण्यासाठी एसटीला तुमच्यासारख्या प्रतिभावंत प्रवाशांच्या मदतीची गरज आहे. एसटीने प्रवासाला प्राधान्‍य दिल्यास एसटीला जीवदान मिळेल, असे श्री. रेडकर यांनी नमूद केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com