सहा आठवड्यांत 'निमा'चा वाद निकाली काढा; उच्च न्यायालयाचे आदेश

सतीश निकुंभ
Wednesday, 16 September 2020

ती मागणी न्यायालयाने फेटाळली. म्हणजेच कार्यकारी समिती कायदेशीर आहे असा सरळसरळ अर्थ निघतो. सहा आठवड्यांत निमातील वाद सोडविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले, अशी माहिती विशेष कार्यकारी समितीचे अध्यक्ष विवेक गोगटे, सरचिटणीस आशिष नहार यांनी दिली. 

नाशिक : (सातपूर)अनेक महिन्यांपासून सुरू असलेला ‘निमा’तील वाद सहा आठवड्यांत निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिल्याची माहिती निमाच्या सूत्रांनी दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे दोन्ही गटांनी पत्रकार परिषद घेऊन स्वागत केले आहे. 

उच्च न्यायालयाचे धर्मादाय आयुक्तांना आदेश 

विशेष कार्यकारी समितीचे अध्यक्ष विवेक गोगटे, सरचिटणीस आशिष नहार, खजिनदार संदीप भदाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. गोगटे यांनी सांगितले, की निमाचा कारभार कायदेशीर आणि घटनेप्रमाणेच चालावा, अशी भूमिका आहे. म्हणूनच उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. मंगळवारी (ता. १५) झालेल्या सुनावणीत विरोधी गटाने निमाची घटना शपथपत्राद्वारे मान्य केली. त्यामुळे आता त्यांनी पदभार सोडला पाहिजे. दुसरी बाब म्हणजे विरोधकांनी कार्यकारी समितीच्या कारभाराला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ती मागणी न्यायालयाने फेटाळली. म्हणजेच कार्यकारी समिती कायदेशीर आहे असा सरळसरळ अर्थ निघतो. सहा आठवड्यांत निमातील वाद सोडविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले, अशी माहिती विशेष कार्यकारी समितीचे अध्यक्ष विवेक गोगटे, सरचिटणीस आशिष नहार यांनी दिली. 

 ४८ पैकी केवळ आठ पदाधिकाऱ्यांनाच नोटिसा

निमा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी सांगितले, की निमा विश्वस्त मंडळाने नेमलेल्या विशेष कार्यकारी समितीला आम्ही पदभार सोपविला नाही. म्हणून समितीने विश्वस्त मंडळाकडे दाद मागणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निमा कार्यकारिणीच्या ४८ पैकी केवळ आठ पदाधिकाऱ्यांनाच नोटिसा पाठविल्या आहेत. आम्हीच या वादाबाबत धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. 

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

आता न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना सहा आठवड्यांत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे आदेश आम्हाला मान्य आहेत. जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही पदभार सोडणार नाही, अशी माहिती अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली. धर्मादाय उपायुक्तांनी २१ सप्टेंबर ही तारीख दिल्याचे दोन्ही गटांकडून सांगण्यात आले.  

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In six weeks Settle Nima's dispute, High Court order nashik marathi news