कौशल्य विकास प्रशिक्षित शेतमजुरांनी स्वतंत्र ओळख निर्माण करावी - कृषिमंत्री

dada bhuse malegaoan.
dada bhuse malegaoan.

नाशिक/मालेगाव : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध निविष्ठांसोबतच शेतमजूरांची कार्यक्षमता महत्वाची आहे. सध्याच्या पिक पध्दतीत अनेक कामे ही कौशल्यावर आधारीत आहेत. औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी या कामांसाठी शेतमजुरांना व्यवस्थित कौशल्य प्रशिक्षण दिले तर त्यांच्या कामांची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारतो. तालुक्यात आत्मा अंतर्गत कौशल्य आधारीत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षीत शेतमजुरांनी स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे केले.

तळवाडे (ता. मालेगाव) येथील डाळींब पिकांसाठी छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या 50 शेतमजूरांसाठी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त धिरज कुमार, कृषी संचालक डॉ.नारायण शिसोदे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
निळगव्हाण फळरोपवाटीकेत कापूस व मका, डाळींब पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतमजूरांसाठी प्रशिक्षण ऑगस्टमध्ये पार पडले. यात 50 शेतमजूर सहभागी झाले. चिंचावड येथे शेवगा छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजूरांसाठीचे प्रशिक्षण ऑक्टोबरमध्ये झाले. यात 55 शेतमजूर सहभागी झाले. त्यांना भुसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच सौर उर्जेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सोलर लॅम्प, सोलर कुकर वाटप करण्यात आले.


ग्राम बीजोत्पादन योजनेचा शुभारंभ

महाबीजच्या माध्यमातून दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. बियाणे वाटपात शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून सुमारे 68 कोटी रुपयांची मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले. दाभाडी येथे प्रातिनिधीक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना बियाण्याच्या गोणीचे वितरण श्री.भुसे व धिरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ना नफा ना तोटा तत्वावर जवळपास 800 क्विटंल बियाणे शेतकऱ्यांना वितरीत झाल्याचे प्रमोद निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले. दाभाडी येथे विकेल ते पिकेल या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजीपाला स्टॉलचे लोकार्पण भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. आगामी काळात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांतर्फे कृषी विभागाच्या योजना राबविण्याचा मानस आहे. यामुळे समूह शेतीला चालना मिळेल. शेतकऱ्यांनी संघटित होऊन समूह शेतीसाठी एकत्रित यावे. यासाठी तसेच महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याच्या सुचना त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.

कृषी आयुक्त धिरज कुमार म्हणाले, कृषी संजीवनीसोबतच रानभाज्यांचा प्रकल्प राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डी मार्ट प्रमाणेच कृषी मार्ट संकल्पना उदयास येत आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा अहवाल कृषी विभागातर्फे शासनाला सादर होईल. विमा कंपन्यांशी देखील पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांना मदतीतून दिलासा देऊ. 

 

जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी विक्रमी संख्येने आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांशी समन्वय साधून लिलाव प्रक्रियेची कोंडी फोडण्यात यश आले. व्यापाऱ्यांकडील कांदा साठवण क्षमता वाढीसाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच केंद्रातर्फे निर्बंध शिथील हाेतील. - दादा भुसे, कृषिमंत्री 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com