#Lockdown : सटाणा पोलीसांची 'अशी' कामगिरी..घडविले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याने सर्व शहरे ओस पडली असून अनेक मोठे उद्योग आणि कंपन्यांचे कारभार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात गेलेले हजारो युवक सध्या बेरोजगार झाले असून उपासमार होत असल्याने सध्या हे सर्व युवक आपापल्या आपल्या मूळ गावी परतत आहेत. मात्र वाहन व्यवस्था नसल्याने अनेक युवक नाशिकहून सटाणामार्गे नंदुरबार जिल्हयाकडे पायी निघाले आहेत. भर उन्हातान्हात पायी निघालेल्या या युवकांकडे जेवणासाठी पैसेही नाहीत

नाशिक / सटाणा : कोरोनामुळे सध्या नाशिक, मुंबई, पुणे यांसह विविध ठिकाणाहून आपल्या मूळ गावी परतण्यासाठी सटाणा शहरामार्गे जाणार्‍या बेरोजगार युवक व युवतींना सटाणा पोलिसांचा मोठा आधार मिळाला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत सटाणा पोलिसांनी या युवकांना जेवणच दिले नाही तर त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्थाही करून दिली. त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन झाले. 

सटाणा पोलिसांनी जोपासली सामाजिक बांधिलकी 
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याने सर्व शहरे ओस पडली असून अनेक मोठे उद्योग आणि कंपन्यांचे कारभार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात गेलेले हजारो युवक सध्या बेरोजगार झाले असून उपासमार होत असल्याने सध्या हे सर्व युवक आपापल्या आपल्या मूळ गावी परतत आहेत. मात्र वाहन व्यवस्था नसल्याने अनेक युवक नाशिकहून सटाणामार्गे नंदुरबार जिल्हयाकडे पायी निघाले आहेत. भर उन्हातान्हात पायी निघालेल्या या युवकांकडे जेवणासाठी पैसेही नाहीत. धानोरा (जि.नंदुरबार) कडे जाणार्‍या या युवकांची ही अवस्था येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

सामाजिक कार्यकर्ते चेतन मोरे यांच्या माध्यमातून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांनी या युवकांसाठी जेवणाची व्यवस्था करून दिली. यानंतर नंदुरबार कडे जाणार्‍या एका वाहनचालकाशी संपर्क साधून शिंदे यांनी या सर्व युवकांना आपल्या मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्थाही करून दिली. कोरोना महामारीच्या संकटात लोकांना शिस्त लावणे, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणे अशा जबाबदार्‍या सांभाळणार्‍या सटाणा पोलिसांकडून मिळालेल्या या मदतीमुळे समाधानी झालेले युवक व युवती आपल्या गावी सुखरूप परतले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social commitment maintained by the Santana police nashik marathi news