कृषिकन्येची महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी धडपड! लॉकडाऊनमधील संसाराची घडी सावरण्यासाठी मोफत धडे...

मोठाभाऊ पगार
Sunday, 26 July 2020

लॉकडाउन काळात संसाराची घडी सावरण्यासाठी महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे देत ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी धडपड करत आहे भऊर (ता. देवळा) येथील सुजाता पवार ही कृषिकन्या. 

नाशिक / देवळा : लॉकडाउन काळात संसाराची घडी सावरण्यासाठी महिलांना मोफत गृहउद्योगाचे धडे देत ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी धडपड करत आहे भऊर (ता. देवळा) येथील सुजाता पवार ही कृषिकन्या.  

निर्मिती व विक्रीचीही शिकवण 
सुजाता ही कोकण कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्रीच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असून, सध्या ती कोविड काळात मिळालेल्या सुटीत आपल्या शिक्षणाचा वापर करत गावातील महिलांना गृहउद्योगाचे मोफत धडे देत आहे. याशिवाय येथील शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देत आहे.सुजाता ही प्रकाश पवार यांची कन्या असून, युवा शेतकरी असलेले तिचे काका बाबा पवार यांचे तिला सहकार्य मिळत आहे. लॉकडाउन काळात सध्या गावी आलेली सुजाता परिसरातील महिलांना आंब्यापासून जाम, आंबा पोळी, आमचूर, सिरप, स्क्वॅश, लोणचे यांसारखे विविध पदार्थ तयार करणे, पनीर तयार करणे अशा विविध गोष्टी शिकवत आहे. या गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने यांचा फक्त घरगुती मर्यादित उपयोग न करता विविध खाद्यपदार्थनिर्मिती व विक्री याची शिकवण ती या महिलांना देत आहे. 

कौतुकाचा विषय 
शिवाय याच उद्योगांमागील अर्थकारणही समजून सांगत असल्याने हातावर पोट असलेल्या महिलांना विकासाच्या वाटा दिसू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी धडपडणारी कृषिकन्या सध्या कौतुकाचा विषय ठरली आहे. 

हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

मातीशी नाळ अन्... 
मातीपरीक्षण का करावे, मातीपरीक्षणसाठी नमुना कसा घ्यावा, त्याचे फायदे काय? शेतात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व त्यामुळे होणारे फायदे याबाबत शेतकऱ्यांना ती अभ्यासूवृत्तीने माहिती देते. शेतातल्या कुटुंबीयांसमवेत काम, त्यांच्या अडचणी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी उद्योजकता वाढविणे गरजेचे आहे. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हे मोफत प्रशिक्षण सुरू केल्याचे तिने सांगितले. 

 हेही वाचा > VIDEO : बघ्यांची भरलेली जत्रा बघताच बिबट्या बिथरतो तेव्हा....काय घडले?

शेतीसोबत जोडधंदा 
गेल्या काही दिवसांपासून सुजाता आम्हाला दीर्घकाळ टिकणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांबाबत माहिती देत असून, ते तयार कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. या गोष्टीमुळे भविष्यात आम्ही शेतीसोबत जोडधंदा म्हणून काही पदार्थ तयार करून बाजारात त्याची विक्री करून छोटा-मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, असे सोनाली निकम या गृहिणीने सांगितले. 

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil testing lessons for women with home industries nashik deola marathi news