VIDEO : नाशिकच्या आयएसपी प्रेसमध्ये लवकरच ''ई-पासपोर्ट'' छपाई..! अखेर परराष्ट्र मंत्रालयाचा हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनीच नाशिक रोडला ई-पासपोर्टची निर्मिती सुरू होणार असल्याचे जाहीर केल्याने कामगारांत उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल १२ ते १५ वर्षांपासून येथील कामगार संघटना त्यासाठी प्रयत्नशील होत्या. परराष्ट्र व्यवहार विभागाने नाशिक रोडलाच पासपोर्ट छपाई होणार असल्याचे स्पष्ट केल्याने, कामगारांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

नाशिक रोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयातील ई-पासपोर्ट छपाईचा विषय अखेर मार्गी लागला आहे. ई-पासपोर्टच्या सिक्युरिटी फीचरसोबतच त्यातील महत्त्वाच्या ‘ई-चीप’ नाशिक रोडच्या मुद्रणालयात बसविण्यास अखेर परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. 

रखडलेल्या सिक्युरिटी थ्रेड, ई-चीप कामांना हिरवा कंदील 

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनीच नाशिक रोडला ई-पासपोर्टची निर्मिती सुरू होणार असल्याचे जाहीर केल्याने कामगारांत उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल १२ ते १५ वर्षांपासून येथील कामगार संघटना त्यासाठी प्रयत्नशील होत्या. परराष्ट्र व्यवहार विभागाने नाशिक रोडलाच पासपोर्ट छपाई होणार असल्याचे स्पष्ट केल्याने, कामगारांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणारी २० ते २५ वर्षे हे काम या ठिकाणी होणार असल्याचा अंदाज कामगार मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी व्यक्त केला. 

पारपत्र अद्ययावत होणार 
परदेशी जाण्यासाठीच्या महत्त्वाच्या पासपोर्टचे रूपांतर आता ई-पासपोर्टमध्ये होणार आहे. नव्या पासपोर्टच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. हे सगळे बदल प्रतिभूती मुद्रणालयातील पासपोर्ट निर्मितीच्या कामाची गुणवत्ता पारखून परराष्ट्र व्यवहारमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी दिल्लीत जाहीर केले आहे. येत्या काही दिवसांतच ई-पासपोर्टची निर्मिती नाशिक रोड येथील आयएसपी प्रेसमध्ये होणार असून, फोल्डिंग विभाग, शिलाई विभाग, पेस्टिंग विभाग, नंबरिंग व बारकोड यांसारख्या सुविधा नाशिक रोडच्या मुद्रणालयात वाढविल्या जाणार आहेत. नवीन पासपोर्टमध्ये लावण्यात येणारी चीप प्रेसमध्येच लावण्यात येणार असून, डिजिटयझेशन करून ई-पासपोर्टची निर्मिती करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र खात्याने जाहीर केल्याने, येणारी २० ते २५ वर्षे कामगारांना काम मिळणार असून, नाशिकच्या पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात पासपोर्टच्या निर्मितीतून चालना मिळणार असल्याचे जुंद्रे यांनी सांगितले. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

कामगार संघटनेचा पाठपुरावा 
प्रतिभूती मुद्रणालयात ई-पारपत्रासाठी पी. चिदंबरम अर्थमंत्री असल्यापासून विषय सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कारकीर्दीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, सिक्युरिटी थ्रेड, चीपसह काही तांत्रिक विषय रखडलेले होते. मात्र कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, जगदीश गोडसे व इतर पदाधिकाऱ्यांनी आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. विविध विभागांत करण्यात येणारे बदल व सूचना कामगारांनी सुचविल्या होत्या. आजपर्यंत केंद्राने दिलेले पासपोर्ट निर्मितीचे उद्दिष्ट कामगारांनी वेळेत पूर्ण केले. 

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

कामाची गुणवत्ता पाहून परराष्ट्र खात्याने हा निर्णय घेतला आहे. सिक्युरिटी फीचर, चीप या पासपोर्टमध्ये असणार आहे. आयएसपीमधील सध्या अस्तित्वात असणाऱ्या निरनिराळ्या विभागांना विस्तृत स्वरूप देण्यासाठी केंद्रस्तरावरून बदल घडणार आहेत. आजपर्यंत वेळेवर पासपोर्टची निर्मिती करून दिल्यामुळे केंद्राने नाशिकला पुन्हा एकदा चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. -ज्ञानेश्वर जुंद्रे (मजदूर संघ)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon "e-passport" will be printed at Nashik Securities Press nashik marathi news