दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्थचक्राला गती! नवीन गृहप्रकल्पांचे उद्‍घाटन, वाहन बाजारातही तेजी

विक्रांत मते
Sunday, 25 October 2020

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बंद राहिली, तर रिक्षा किंवा अन्य वाहनांतून प्रवास करणे धोकादायक असल्याची बाब लक्षात घेता दुचाकी व चारचाकींना मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहन कर्जदेखील कमी करण्यात आल्याने त्याचा लाभ ग्राहकांकडून घेतला जात आहे.

नाशिक : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थचक्राला गती मिळण्याचे संकेत दसऱ्याच्या निमित्ताने मिळाले असून, गृहबांधणी, इलेक्ट्रॉनिक्स व दुचाकी, चारचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या दिवशी शहरात कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता असल्याने तो मुहूर्त साधण्यासाठी बाजारपेठदेखील सज्ज आहे. 

ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने खरेदीला वेग

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने यंदा मार्च ते जूनदरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. राज्य शासनाने पुनश्‍च हरि ओमचा नारा देताना एक-एक व्यवहार सुरळीत केले. कोरोनामुळे नागरिक पूर्ण क्षमतेने बाहेर पडत नव्हते. त्यामुळे अर्थव्यवस्था उभारी घेण्याची शक्यता फारच कमी होती. परंतु दसऱ्यामुळे ही शक्यता फेटाळली गेली असून, त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने खरेदीला वेग आला आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या बांधकाम व ऑटोमोबाईल क्षेत्राने अधिक उचल खाल्ली आहे. 

फ्लॅट, प्लॉटला मागणी वाढली
 
राज्य शासनाने बांधकाम व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात, तर नरेडकोच्या सभासदांकडे फ्लॅट बुकिंग केल्यास उर्वरित तीन टक्के सवलत दिल्याने घरांना मागणी वाढली आहे. त्याप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर ६.९५ टक्क्‍यांपर्यंत घसरले. पंतप्रधान आवास योजनेत २.६७ लाख रुपयांचे अनुदान मिळत असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहक सरसावले आहेत. कोरोनामुळे स्वतंत्र वास्तव्याची वाढलेल्या मानसिकतेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नागरिकांनी नाशिकमध्ये वास्तव्याला पसंती दिल्याने त्याचा परिणाम गृहखरेदीवर दिसून येत आहे. 

स्वतंत्र वाहन खरेदीकडे कल 

कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बंद राहिली, तर रिक्षा किंवा अन्य वाहनांतून प्रवास करणे धोकादायक असल्याची बाब लक्षात घेता दुचाकी व चारचाकींना मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहन कर्जदेखील कमी करण्यात आल्याने त्याचा लाभ ग्राहकांकडून घेतला जात आहे. आठ दिवसांत मोपेडची मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली असून, रेसिंग बाइकलाही मागणी वाढली आहे. सेंकड हॅन्ड कारच्या मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

बॅंकांनी व्याजदरात केलेली कपात, राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात झालेली घट व प्रत्येकाला स्वतंत्र घराची गरज भासू लागल्याने घरांना मागणी वाढली आहे. भाडेतत्त्वावरील घरभाड्याचा हप्ता व बॅंकांचा हप्ता सारखाच असल्याने नवीन घरांना मागणी वाढली आहे. - नरेश कारडा, संचालक, कारडा डेव्हलपर्स 

नाशिकमधील स्वच्छ हवामान, मुद्रांक शुल्कात झालेली घट व कोरोनामुळे स्वतंत्र घर घेण्याकडे कल वाढला आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर नवीन गृहप्रकल्पांचे उद्‍घाटन होत आहे. - अनिल आहेर, सहसचिव, क्रेडाई नाशिक मेट्रो  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​up the economic cycle at the moment of Dussehra nashik marathi news