सुरगाण्यातील श्रीभुवन व दुमी योजनेचे जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण 

रविंद्र पगार
Friday, 2 October 2020

नाशिक येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रास्तवित सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती.

नाशिक/कळवण :  सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे  सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करुन लाभक्षेत्रातील आदिवासी बांधवांशी संवाद साधला.  प्रश्नांचे आमदार पवार व जलसंपदा यंत्रणेकडून निरसन झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दुमी व श्रीभुवन प्रकल्पाचा प्रस्ताव  शासनस्तरावर तात्काळ सादर करण्याच्या सुचना संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पस्थळावर दिल्या. त्यामुळे सुरगाणा तालुक्यात सिंचन योजना मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

जलसंपदामंत्र्यांनी आदेश दिले होते

नाशिक येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रास्तवित सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे व यंत्रणेला आमदार पवारांसमवेत सुरगाणा तालुक्यातील दुमी व श्रीभुवन योजनाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची पहाणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत दिले होते. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन प्रकल्प

सुरगाणा तालुक्यात एकही मोठी सिंचन योजना नसल्याने केवळ 2 टक्के सिंचन होते, पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते, उन्हाळ्यात रोजगारासाठी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते, तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन ओलिताखाली आणणे हा एकमेव पर्याय आहे, त्यामुळे श्रीभुवन लघुपाटबंधारे योजना व पार नदीवरील दुमी लघु पाटबंधारे प्रकल्पास शासनाने मान्यता द्यावी व निधी देऊन प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी बैठकीत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुरगाण्यातील स्थलांतर रोखण्यासाठी पाटील यांनी सुरगाण्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन बैठकीत दिले व सुरगाण्यातील योजनांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्यामुळे यंत्रणेने श्रीभुवन व दुमी योजनेची पहाणी करुन आदिवासी बांधवांशी संवाद साधला.यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारीसह, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू  पवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, काशिनाथ वाघमारे,युवराज लोखंडे,एकनाथ वार्डे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

दुमी प्रकल्प हा पार नदीवर असून साठवण क्षमता 1700 द.ल.घ.फु. आहे. त्या अंतर्गत दोन कालवे असून एक कालवा 34.13 कि.मी. व दुसरा 42.17 कि.मी. आहे. दोन्ही कालव्या अंतर्गत सुरगाणा, पेठ व दिंडोरी या तालुक्यातील 35 गावांचे 5000 एकर क्षेत्र सिंचनाखालील येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा सविस्तर अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी कोकण महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे .- आमदार नितीन पवार, कळवण सुरगाणा

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sribhuvan and dumi yojana Survey by Water Resources Department nashik marathi news