‘एसटी’ला पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत मिळाले 'इतके' प्रवासी! तब्बल सहा महिन्यांनंतर सुटली लाल परी

विनोद बेदरकर
Friday, 21 August 2020

कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन सुरू केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद झाली आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची चाके जागेवर थांबली. पाच महिन्यांनंतर येथील सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकावरून कसारा, मुंबई, बोरिवली, पुणे, औरंगाबाद, धुळ्यासाठी बसगाड्या सोडण्यात आल्या.

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन सुरू केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद झाली आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची चाके जागेवर थांबली. पाच महिन्यांनंतर येथील सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकावरून कसारा, मुंबई, बोरिवली, पुणे, औरंगाबाद, धुळ्यासाठी बसगाड्या सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत ३८२ प्रवासी मिळाले आहेत. 

सहा महिन्यांनंतर सीबीएस व महामार्गावरून सुटल्या बस 
एस.टी.ची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी अशी सर्व प्रकारची बससेवा मूळ तिकीटदरात टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले. एस.टी. प्रवासासाठी ई-पासची आवश्‍यकता नसून प्रवासात सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. प्रवासात मास्क वापरायचा आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहे. बसगाडी सोडण्यापूर्वी ती सॅनिटाइझ करण्यात आली. गुरुवारी (ता. २०) सायंकाळी सहापर्यंत २० बसगाड्या नाशिक येथून पुणे, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, कसारा, बोरिवली, वैजापूर या मार्गांसह अन्य जिल्ह्यांत सोडण्यात आल्या. प्रत्येक बसगाडीमध्ये साधारणतः १६ ते १८ प्रवासी गेले. त्याचप्रमाणे सटाणा, कळवण, मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, सिन्नर पेठ या तालुक्यांच्या ठिकाणाहून नाशिकसाठी एक ते दोन तासांनी बसगाड्या सोडण्यात आल्या. तालुका ते नाशिक या मार्गावर प्रत्येक फेरीस २२ प्रवासी मिळाले आहेत. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

अतिरिक्त बसगाड्यांचे नियोजन 
एस.टी.तर्फे शुक्रवारी (ता. २१) प्रवासी गर्दी पाहून अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक-पुणे, नाशिक-धुळे या मार्गावर तासाला बसगाडी उपलब्ध असेल. नाशिकहून औरंगाबाद, नगर मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार पुरेशा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.  

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST got passengers for first day nashik marathi news