सरकार पाठीशी उभे, लवकरच मदतीची घोषणा : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. काळजीचा कालखंड दिसतोय. त्यामुळे सरकारने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लोकजागृती आणि स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे सांगत त्यांनी सरकार पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाचे पंचनामे दोन दिवसांमध्ये संपवून राज्य सरकार मदतीची घोषणा करेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी (ता. 7) येथे दिली. तसेच कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. काळजीचा कालखंड दिसतोय. त्यामुळे सरकारने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लोकजागृती आणि स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे सांगत त्यांनी सरकार पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली. 

बाळासाहेब थोरात : "कोरोना'त लोकजागृती आणि स्वयंशिस्त महत्त्वाची 

चक्रीवादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून जाणार याची जाणीव तीन ते चार दिवस अगोदर होती. त्यामुळे सरकार, प्रशासन सावध होते. हे संकट कानावरून गेले, असे म्हणावे लागेल. मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसला नाही हे महत्त्वाचे आहे, असेही श्री. थोरात यांनी सांगितले. सरकारी विश्रामगृहात कोरोना नियंत्रण आणि चक्रीवादळाच्या आढाव्याच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

 
बाहेरून आलेल्यांमुळे रुग्ण वाढले 

थोरात म्हणाले, की नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून आलेल्यांना थेट घरी न पाठवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या अडीच महिन्यांत लोकांना बरीच माहिती मिळाली आहे. एकमेकांच्या सहकार्याने आता पुढे जात कोरोना संकटावर मात करावी लागेल. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

मालेगाव एक यशस्वी मॉडेल 
जिल्हा अडीच महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करतोय. काही संवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेतली गेली. त्यात मालेगावचा समावेश होता. सुरवातीला मालेगावातील वाढलेली रुग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती; परंतु प्रशासकीय पातळीवर आपसातील जबाबदारी वाटपाच्या सूत्रामुळे मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले आहे. मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसतेय. मालेगावात रुग्णसंख्या व कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसतेय, असे थोरात यांनी सांगितले. 

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government will announce help in two days said by balasaheb thorat nashik marathi news