दिव्यांग निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा; प्रहार संघटनेची मागणी

संतोष विंचू
Monday, 12 October 2020

वारंवार पत्रव्यवहार करूनही या ग्रामपंचायतींवर कारवाई केली जात नसल्याने यापुढे जर मागणीची दखल घेतली नाही, तर प्रहार स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे यांनी दिला.

नाशिक : (येवला) शासनाने स्वतंत्रपणे निर्णय काढून ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी अपंगांच्या विकासावर खर्च करणे अनिवार्य केले आहे. असे असताना तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या निर्णयाला ठेंगा दिला असून, निधी खर्च केलेला नाही. हा निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. 

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन 

येवला तालुक्यातील आडसुरेगाव, आहेरवाडी, आंबेगाव, बाळापूर, भारम, बोकटे, देशमाने, धामोडे, डोंगरगाव, गवंडगाव, जळगाव नेऊर, कातरणी, खैरगव्हाण, मानोरी बुद्रुक, मुखेड, नागडे, नायगव्हाण, पारेगाव, पाटोदा, पुरणगाव, राजापूर, रेंडाळे, साताळी, शिरसगाव लौकी, सोमठाणदेश, सुरेगाव रस्ता, विसापूर या ग्रामपंचायतींनी नियमाप्रमाणे पाच टक्के दिव्यांग निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे निधी खर्च न करणाऱ्या या ग्रामपंचायतींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

तर प्रहार स्टाइलने तीव्र आंदोलन होईल

वारंवार पत्रव्यवहार करूनही या ग्रामपंचायतींवर कारवाई केली जात नसल्याने यापुढे जर मागणीची दखल घेतली नाही, तर प्रहार स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे यांनी दिला. प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, संपर्कप्रमुख सचिन पवार, गणेश लोहकरे, रामभाऊ नाईकवाडे, जनार्दन गोडसे, शंकर गायके, संजय मेंगाणे, गोरख निर्मळ आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement to the group development officer of Prahar organization nashik marathi news