''पंख्याला दोरीने लटकून गळफास घ्या!'' ग्रामसेवकाचा शिपाई महिलेस अजब सल्ला

पोपट गंवादे
Thursday, 15 October 2020

थकीत पगाराची मागणी करत असलेल्या शिपाई महिलेस ग्रामसेवकाकडून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत ग्रामपंचायत कार्यालयातील पंख्याला दोरीने गळफास घेण्याचा सल्ला देण्याचा प्रकार नांदगावसदो (ता. इगतपुरी) येथे घडला.

नाशिक : (इगतपुरी शहर) थकीत पगाराची मागणी करत असलेल्या शिपाई महिलेस ग्रामसेवकाकडून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत ग्रामपंचायत कार्यालयातील पंख्याला दोरीने गळफास घेण्याचा सल्ला देण्याचा प्रकार नांदगावसदो (ता. इगतपुरी) येथे घडला. या प्रकरणी संबंधित महिलेने गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. 

असा आहे प्रकार

लीलाबाई संजय गिरी असे पीडित महिलेचे नाव असून, त्या नांदगावसदो ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई आहेत. ग्रामसेवक मुकेश वाघ यांनी त्यांचे म्हणणे न ऐकताच शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी पीडित महिलेसह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. तसेच, न्याय न मिळाल्यास आपण पंचायत समितीसमोर प्राणत्याग करणार असल्याचा इशाराही पीडित महिले निवेदनात दिला आहे. लीलाबाईंचे पती नांदगावसदो ग्रामपंचायतमध्ये परिचर पदावर कार्यरत होते. २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे लीलाबाईंना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली. 

हेही वाचा > विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गेल्या चार वर्षांपासून त्या शिपाईपदावर कार्यरत आहेत. मात्र, त्यांना अद्यापही वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान आडोळे व ग्रामपंचायत सदस्य विजयाबाई भागडे, वर्षा भागडे, मंजूबाई भागडे, भालचंद्र भागडे यांना समजली. त्यांनी ग्रामसेवक मुकेश वाघ यांचा निषेध करीत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.  

हेही वाचा > हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strange advice to Gramsevaks peon woman nashik marathi news