मालेगावात अंतिम वर्षाच्या परीक्षेत गोंधळ; ऑफलाइनलाही अडचणी आल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत 

प्रमोद सावंत
Saturday, 17 October 2020

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा शुक्रवार (ता.१६)पासून सुरू झाल्या. ऑफलाइन असलेल्या २० टक्के परीक्षार्थींनाही वेळेवर पेपर मिळाले नाहीत.

नाशिक/मालेगाव : पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा शुक्रवार (ता.१६)पासून सुरू झाल्या. ऑफलाइन असलेल्या २० टक्के परीक्षार्थींनाही वेळेवर पेपर मिळाले नाहीत. ऑनलाइन परीक्षेबाबतही गोंधळच असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यामुळे परीक्षा देऊनही याबाबत सर्व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना अडचणी

आज ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे लॉगइन झाले नाही, तर काहींना लॉगइन होऊनसुद्धा परीक्षा देता आली नाही. विद्यापीठाने दिलेल्या लिंक वेळेवर सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ॲपवरून परीक्षा दिली, त्यांचा पेपर सबमिट झालाच नाही. ऑनलाइन परीक्षेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही विद्यार्थ्यांना दोन-तीन वेळा परीक्षा द्यावी लागली. दुपारी एकला परीक्षा सुरू झाल्यानंतर तासाभरात ऑनलाइन पेपर संपणे अपेक्षित होते. मात्र अडचणींमुळे चार ते पाचपर्यंत विद्यार्थी परीक्षाच देत होते. काहींना ऑनलाइन पेपर सबमिट झालेला नाही, असे दिसत होते. याउलट पेपर सबमिट न होता परीक्षा झाल्याचे व लॉगइनला टेस्ट कम्पिलीट झाल्याचे दिसत होते, असे विजय जगताप या विद्यार्थ्याने सांगितले. आपण स्वत: बॉटनीच्या पेपरला हा अनुभव घेतल्याचे त्याने सांगितले. एकूणच विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students had to face difficulties in exams nashik marathi news